कारागृहाच्या बंद भिंतींनाही पाझर फुटतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 07:23 PM2018-11-14T19:23:03+5:302018-11-15T00:24:12+5:30

‘बाबा, आमच्या शाळेत की नाही खूप मज्जा येते. मॅडमनी आम्हाला चित्र काढायला सांगितले. मी छान छान चित्र पण काढले होते. तुम्हाला दाखवायला आणायचे होते...’ १० वर्षांची त्याची चिमुकली मुलगी सारखी बोलत होती, शाळेच्या, घरच्या, नातेवाईकांच्या गोष्टी सांगत होती. तो मात्र स्तब्धपणे तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर आठ-नऊ वर्षांपासून तो या कारागृहातच होता. त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. बंदिस्त भिंतीच्या आडच्या गोष्टीशिवाय काहीच नव्हते... व या गोष्टी तो सांगणार तरी कसा? कौतुकाने पाहत असतानाच,‘बाबा तुम्ही घरी कधी येणार?’ या अचानक आलेल्या प्रश्नाने तो गडबडला आणि मघापासून कंठात रोखलेला हुंदका अश्रूंनी बाहेर आला. चिरेबंदी आणि कठोर भिंतींना पाझर फुटावा तसा... नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बुधवारी असे एक नव्हे अनेक दृश्य एकामागून एक सरकत होते.

When the prison walls break tears ... | कारागृहाच्या बंद भिंतींनाही पाझर फुटतो तेव्हा...

कारागृहाच्या बंद भिंतींनाही पाझर फुटतो तेव्हा...

Next
ठळक मुद्देमुलांच्या भेटीने गहिवरले बंदिवान : बालकदिनानिमित्त कैद्यांची मुलांसोबत ‘गळाभेट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘बाबा, आमच्या शाळेत की नाही खूप मज्जा येते. मॅडमनी आम्हाला चित्र काढायला सांगितले. मी छान छान चित्र पण काढले होते. तुम्हाला दाखवायला आणायचे होते...’ १० वर्षांची त्याची चिमुकली मुलगी सारखी बोलत होती, शाळेच्या, घरच्या, नातेवाईकांच्या गोष्टी सांगत होती. तो मात्र स्तब्धपणे तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर आठ-नऊ वर्षांपासून तो या कारागृहातच होता. त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. बंदिस्त भिंतीच्या आडच्या गोष्टीशिवाय काहीच नव्हते... व या गोष्टी तो सांगणार तरी कसा? कौतुकाने पाहत असतानाच,‘बाबा तुम्ही घरी कधी येणार?’ या अचानक आलेल्या प्रश्नाने तो गडबडला आणि मघापासून कंठात रोखलेला हुंदका अश्रूंनी बाहेर आला. चिरेबंदी आणि कठोर भिंतींना पाझर फुटावा तसा... 


नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बुधवारी असे एक नव्हे अनेक दृश्य एकामागून एक सरकत होते. बालकदिनाच्या निमित्ताने कारागृहाच्या उंच भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या बंदिवानांसाठी प्रेमाचे काही क्षण मिळाले. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती म्हणजेच बालकदिनाचे औचित्य साधून कारागृह प्रशासनानेच ही ‘गळाभेट’ची व्यवस्था बंदिवानांसाठी केली होती. दरवर्षीच्या उपक्रमानुसार यावर्षीही सिद्धदोष कैद्यांनी मुलांच्या भेटीसाठी विनंती केली होती व त्यानुसार त्यांच्या १६ वर्षांखालालील किशोरवयीन मुलांच्या भेटीचा क्षण प्रशासनाने उपलब्ध केला. या भेटीसाठी आतूर झालेले बंदिवान आणि बाहेर त्यांची मुले व सोबत आलेले नातेवाईक सकाळपासूनच आतुरतेने वाट पाहत होती. कारागृहाच्या मोठ्या द्वारातून आत येणाऱ्या

कारागृहात द्वार उघडले आणि आतापर्यंत (किंवा अनेक दिवसांपासून) या क्षणासाठी आसुसलेले बंदिवान त्यांच्या क्रमानुसार मुलांना भेटण्यात मग्न झाले. यातील काही बंदिवान नुकतेच आले होते, काही दोन-तीन वर्षांचे कैदी होते, सात-आठ वर्षांचे, जन्मठेपेचे तर काही मृत्युदंडाची शिक्षा झालेलेही होते. एका सावध-बेसावध प्रसंगी त्यांच्या हातून गुन्हा घडला होता आणि दोष सिद्ध झाल्यावर गुन्हेगार म्हणून ते या बाहेरच्या जगाशी संबंध नसलेल्या बंदिस्त भिंतीआड आले होते. जगासाठी ते गुन्हेगार असले तरी त्यांच्या मुलांसाठी ते बाप आहेत व पत्नी, नातेवाईकांसाठी आपला माणूस. अपराधी म्हणून त्यांच्या मनात खंत होती; पण मुलांना मात्र बापासोबत भेटण्याची उत्सुकता होती. यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. गोंदियाचा जय तीन वर्षांपासून येथे शिक्षा भोगत आहे व दीड वर्षांपासून त्याने त्याच्या मुलामुलीला पाहिले नव्हते. फरजाना (बदललेले नाव) आपल्या सात महिन्याच्या मुलाला घेऊन पतीला भेटायला आली होती. लग्नाआधी घडलेल्या गुन्ह्यात लग्नाच्या काही दिवसानंतरच पतीला सात वर्षांची शिक्षा झाली होती. खुनाच्या गुन्ह्यात २०१० पासून जन्मठेप झालेला उमरेडच्या नरहरीला आपल्या १६ वर्षांच्या मुलीला पाहून रडू आवरणे कठीण झाले होते. सरकारी कर्मचारी असलेले शेखर एका गुन्ह्यात अडकले आणि बंदिवान म्हणून कारागृहात जावे लागले. मुलगी व पत्नीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. असे अनेक बंदिवान या गळाभेटीच्या क्षणामुळे भावूक झाले होते. 
 घरचा कर्ता पुरुष गुन्हा करून कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कशा दैना भोगाव्या लागतात, याचे दृश्यही कारागृहाबाहेर दिसत होते. दोन मुलींना घेऊन आपला नंबर येण्याची वाट पाहणाºया सुरवीनने (बदललेले नाव) तिची कैफियत मांडली. पती कारागृहात गेल्यापासून अतिशय दयनीय अवस्थेत जगावे लागत आहे. दोन मुलींची, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्यावर आली असून, त्यासाठी अक्षरश: हाल सहन करावे लागत असल्याचे ती म्हणाली. इतरही बंदिवानांच्या कुटुंबांच्या अशाच हृदयद्रावक कथा आहेत. भावनेचा, हुंदक्यांचा हा क्षण, परंतु गुन्ह्यांचा, गुन्हेगारांचा व ढासळलेल्या समाजव्यवस्थेतील अनेक प्रश्नांचा विचार करायला भाग पाडणारा होता.

  १५७ बंदिवानांच्या भेटी
 गळाभेट कार्यक्रमात मुलांना भेटण्यासाठी १५७ बंदिवानांनी विनंती केली होती. दोन-तीन वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचाही समावेश होता. तीन महिला बंदिवान तसेच मृत्युदंडाची शिक्षा भोगणाऱ्या सात बंदिवानांना भेटीची संधी दिली गेली होती. त्यानुसार त्यांच्याकडून नंबर घेऊन घरच्यांना सुचविले होते. अशा २८९ मुलांची नोंदणी या उपक्रमासाठी झाली. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत गळाभेटीची संधी देण्यात आली होती. बापाने भेटण्यास आलेल्या मुलांना काहीतरी द्यावे यासाठी खाद्यपदार्थांची व्यवस्थाही कारागृह प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले.

  एका क्षणात गुन्हा केला असला तरी, कारागृहात शिक्षा भोगताना समाज व कुटुंबापासून अनेक महिने दूर राहणाऱ्या या बंदिवानांची मानसिकता ढासळलेली असते. त्यांना नियंत्रणात ठेवणे, सांभाळणे कठीण असते. मात्र अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात भावनिक ओलावा निर्माण होतो व त्यांचे डिप्रेशन घालविण्यास मदत होते.
  राणी भोसले, कारागृह अधीक्षक

 

Web Title: When the prison walls break tears ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.