चितेमधील अस्थी गायब झाल्याचा आरोप नातेवाईक करतात तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:00 AM2022-02-22T07:00:00+5:302022-02-22T07:00:18+5:30
Nagpur News आदल्या दिवशी दहन करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी आलेल्या नातेवाईकांना दिवंगत नातेवाईकाच्या अस्थी आढळल्या नाहीत तेव्हा एकच गोंधळ उडाला...
नागपूर : गंगाबाई घाटावर सोमवारी सकाळी एका वेगळ्याच आरोपामुळे प्रचंड गोंधळ उडाला. आदल्या दिवशी (रविवारी) प्रेतावर अंत्यसंस्कार करून गेलेले नातेवाईक दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी आले. मात्र, राख कमी दिसली. त्यात अस्थीही नसल्याची चर्चा सुरू झाली. शंकेवरून यावरून वातावरण तापले. वाद आणि गोंधळ वाढला. अखेर घाटावरील कर्मचाऱ्यांनी राखेतून अस्थी शोधून दिल्या, या घटनेचे चित्रीकरणही केले. यानंतर, हा वाद निवळला.
झाले असे की, तांडापेठ येथील बेबी केशव शिरशिकर (५६) यांच्या मृत्यूनंतर रविवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी प्रेत गंगाबाई घाटावर आणले. आप्तेष्टांच्या उपस्थितीत गोवऱ्यांच्या चितेवर अंत्यसंस्कार झाले. राख थंड झाल्यावर सोमवारी नातेवाईक अस्थी वेचण्यासाठी गेले. मात्र, त्यांना राखेचा ढीग बराच कमी जाणवला, अस्थीही दिसत नव्हत्या. यावरून वादंग माजले. नातेवाइकांसोबत आलेल्या काहींनी अस्थी गायब असल्याची तक्रार करून वाद घालणे सुरू केले. ही वार्ता पसरली. घाटावरील कर्मचाऱ्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. या प्रेतासोबतच अन्य चार प्रेतांवरही गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार झाले होते. लाकडापेक्षा गोवऱ्यांची राख कमी होते, त्यामुळे गोवऱ्यांवर केलेल्या अग्निसंस्कारानंतर उरणाऱ्या राखेच्या ढिगाचा फरक समजावून सांगितला. मात्र, कुणीच ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते.
अखेर घाटावरील कर्मचाऱ्यांनी स्वत: अस्थी शोधण्याची तयारी दर्शविली. व्हिडीओ फोटोग्राफी करून हे काम सुरू झाले. राखेतून सर्व अस्थी शोधून नातेवाइकांच्या स्वाधीन केल्या. दरम्यान, वाद एवढा वाढला की, काही स्वयंघोषित नेतेही पोहोचले, त्यांनी वाद घालणे सुरू केले. प्रेतावर सोन्याचे दागिने होते, असाही आरोप करण्यात आला. अंत्यसंस्कारच्या वेळी सर्व नातेवाईक हजर होते, त्यांच्या उपस्थितीतच अग्नी देण्यात आल्याचे घाटावरील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर नातेवाईक शांत झाले.
अस्थी गायब झाल्या नाहीत : गजेंद्र महल्ले
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडेच दहन घाटांच्या देखभालीची जबाबदारी आहे. या विभागाचे उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले म्हणाले, नातेवाइकांना अस्थी गायब झाल्याची शंका होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी सर्व शोधून दिल्या. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही केले. यात कसलाही घोळ नसून अस्थीही गायब झालेल्या नाहीत.
...