सत्ताधारीच जेव्हा विरोधक होतात... स्थगन प्रस्तावाला केला विरोध, जोरदार नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:11 AM2017-12-14T00:11:36+5:302017-12-14T00:11:46+5:30
विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले.
- योगेश पांडे
नागपूर : विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले. बोंडअळीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाचा विरोध करत, सत्ताधारी बाकांवरील सदस्य जोरदार नारेबाजी करत, सभापतींसमोरील मोकळ्या जागी जमा झाले. सलग चार वेळा कामकाज स्थगित झाल्यानंतर, अखेर उपसभापतींनी दिवसभरासाठीचे कामकाज तहकूब केले.
बुधवारी कामकाज सुरू होताच, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सुरू करण्याबाबत निवेदन केले. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. येथूनच गोंधळाला सुरुवात झाली. गदारोळातच उपसभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारल्यानंतर, सुनील तटकरे यांनी बोंडअळीच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. मात्र, सातत्याने दोन दिवस स्थगनवरील चर्चा नाकारल्यानंतर परत तोच प्रस्ताव मांडणे अयोग्य आहे, अशी भूमिका सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतली. उपसभापतींनी तटकरे यांना बोलणे मांडण्याची परवानगी दिल्यामुळे, सत्ताधारी बाकांवरील सदस्य संतप्त झाले आणि घोषणाबाजी करत, उपसभापतींच्या आसनासमोर गोळा झाले. दुसरीकडे विरोधकदेखील घोषणा देत, आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनीदेखील नारे देण्यास सुरुवात केली. या गोंधळात चार वेळा कामकाज स्थगित करावे लागले. सत्ताधाºयांची नारेबाजी सुरू असतानाच तटकरे यांनी प्रस्ताव मांडला. उपसभापतींनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र, तरीदेखील गोंधळ सुरूच होता. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
मंत्रीच म्हणाले, ‘न्याय द्या!’
सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमकपणे स्थगन प्रस्तावाचा विरोध केला. सभापतींच्या दालनातच स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला असताना, त्यावर सभागृहात बोलण्याची आवश्यकताच नाही. शेतकºयांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर आम्ही चर्चेला तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांकडून त्यांच्या भूमिकेवर गोंधळ सुरू झाल्यामुळे, पाटील यांनी ‘न्याय द्या, न्याय द्या’ अशी उपसभापतींकडे विनंती केली.
पंचनामे झाले कुठे? : बोंडअळीच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बोंडअळीच्या पंचनाम्याला कुठेही सुरुवात झालेली नाही. शासन विरोधकांची गळचेपी करत आहे. शेतकºयांविषयीच्या मुद्द्यांना उचलले की, गोंधळ होत आहे. यातूनच सत्ताधाºयांचा शेतकºयांविषयीचा दृष्टीकोन दिसून येत आहे. सरकार शेतकºयांची दिशाभूल करत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.