सत्यपाल महाराजांची अनासक्ती, निरपेक्षता आणि साधेपणाने सारेच गहिवरतात तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:18 PM2019-09-21T22:18:29+5:302019-09-21T22:20:53+5:30
‘इन्सान पत्थर मे खुदा ढुंढता है, हम तो इन्सान को खुदा समझते है’असे सांगत जगणाऱ्या सत्यपाल महाराजांची अनासक्ती, निरपेक्षता आणि साधेपणाने राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृह शनिवारी भारावलेले जाणवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘इन्सान पत्थर मे खुदा ढुंढता है, हम तो इन्सान को खुदा समझते है’असे सांगत जगणाऱ्या सत्यपाल महाराजांची अनासक्ती, निरपेक्षता आणि साधेपणाने राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृह शनिवारी भारावलेले जाणवले. मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार -२०१८ सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना प्रदान करण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या मार्गावरून चालणाºया या प्रबोधनकारी महाराजांच्या कार्याचा गजर उपस्थितांच्या मनामनात गुंजला.
या समारंभाचे मुख्य पाहुणे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते. ना. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, मारवाडी फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सचिव सुधीर बाहेती, पूनमचंद मालू, महेश पुरोहित, अतुल कोटेचा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
एक लाख रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे स्वरूप असलेला स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार-२०१८ सत्यपाल महाराजांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, कुणी प्रेमाने छातीशी कवटाळावे, तसा आनंद आज आपणास झाला. एक लाख रुपयाचा हा तिसरा पुरस्कार असून, यापूर्वीच्या दोन पुरस्कारासारखीच या पुरस्काराची रक्कमही समाजकार्यासाठी देण्याची घोषणा त्यांनी केली. लहानपणची आठवण सांगून ते म्हणाले, आई गुजराथी समाजातील व्यक्तीच्या घरी भांडी घासायची. वडील राठी कुटुंबाकडे नोकरी करायचे. आई मालकिणीने दिलेल्या साड्या घालायची. मी रुपयासाठी रडायचो. तो देऊ शकत नाही म्हणून आईही रडायची. मात्र समाजाने आपणास सर्वकाही दिले. आता कसलीही आसक्ती नाही. मला जगविणारा समाज आहे. हा समाजच आपला परिवार आहे. तो आज आपल्यासोबत आहे. ज्याच्यासोबत परिवार असतो, तो कधीच अपयशी होत नाही, असा सल्ला त्यांनी आपल्या प्रबोधनपर मनोगतातून दिला.
राज्यपाल म्हणाले, खंजिरीची ताकद मोठी आहे. त्याचा इतिहास साक्षी आहे. तुकडोजी महाराजांचा तोच विचार सत्यपाल महाराज खंजिरीतून समाजाला देत आहे. एक लाखाच्या पुरस्कारापेक्षा त्यांचे कार्य लाखमोलाचे आहे. सत्यपाल महाराजांचा निरासक्तपणा आणि साधेपणा आपणास भावला. सारेच त्यांच्यासारखे साधेपणाने जगले तर या देशातील भ्रष्टाचारच संपेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी म्हणाले, प्रबोधनकार जहाल विचारांचे होते. त्यांच्या स्मृतीचा हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या सत्यपाल महाराजांचे कार्यही त्याच तोडीचे आहे. गाडगेबाबा आणि राष्ट्रसंतांनी व्यक्तीला समाजाचा केंद्रबिंदू मानून त्याला संस्कारित करण्याचे काम केले. संत आणि सुधारकांचा त्यात वाटा मोठा आहे. सत्यपाल महाराजही तो वसा चालवित आहेत. लोकसंग्रह, संस्कार व संघर्षाच्या माध्यमातून समाजाची घडी बसविण्याचे कार्य सुधारकांनी केले. हे कार्य शैक्षणिक संस्थांकडूनही व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अजय संचेती म्हणाले, सत्यपाल महाराज लोकांची भाषा बोलणारे आहेत. लोकांना सहज कळणारी, पण प्रबोधन करणारी त्यांची वाणी समाजपरिवर्तनाचे कार्य करीत आहे. त्यांच्या जगण्यातील साधेपणा सर्वांना भावणारा आहे. प्रारंभी प्रास्ताविकातून डॉ. गिरीश गांधी यांनी फाऊंडेशनच्या कार्याची आणि पुरस्काराच्या आयोजनामागील माहिती दिली. डॉ. वंदना गांधी यांनी परिचय करून दिला. आभार सुधीर बाहेती यांनी मानले. महाराजांच्या कुटुंबीयांसह विदर्भभरातून आलेले गुरुदेवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांचा संकल्प गडकरींनी केला पूर्ण
पुरस्कार स्वरूपात मिळालेल्या रकमेतून मृतदेह ठेवण्यासाठी बॉडी फ्रिजर विकत घेण्याचा मनोदय सत्यापाल महाराजांनी भाषणातून व्यक्त केला. यामागचे कारण सांगताना ते भावूक झाले. पत्नीच्या निधनानंतर देहदान करायचे होते. मृतदेह ठेवण्यासाठी बॉडी फ्रिजरची गरज होती. पण कुणाकडेच नव्हते. सिंधी समाजाकडून ते आणले. भविष्यात गरिबांना अशा कामासाठी कुठे हात पसरावा लागू नये यासाठी या पुरस्काराच्या रकमेतून समाजासाठी बॉडी फ्रिजर घेणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. हे ऐकताना सभागृह भावनिक झाले होते. नितीन गडकरीही काहिसे अस्वस्थ आणि भावूक झालेले दिसले. त्यांनी संचालनकर्त्याच्या माध्यमातून बॉडी फ्रिजर स्वत:कडून देण्याची तयारी दर्शविली. पुरस्काराची रक्कम इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची विनंती केली. त्यांचा मनोदय सभागृहाला कळताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.