हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासात साप निघतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:04 AM2017-12-21T11:04:27+5:302017-12-21T11:04:59+5:30
आमदार निवासात आमदाराच्या गाळ्यामध्ये साप निघण्याच्या घटनेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या अतिविशेष श्रेणीतील व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सिव्हील लाईन्स येथील आमदार निवासात एका आमदाराच्या खोलीत बुधवारी अचानक साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात आमदाराच्या गाळ्यामध्ये साप निघण्याच्या घटनेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या अतिविशेष श्रेणीतील व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. आमदार निवासातील ५० क्रमांकाचे गाळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी तर ५१ क्रमांकाचे गाळे आमदार चरण वाघमारे यांना देण्यात आले आहे. यावेळी आझमी यांच्या खोलीत काही कार्यकर्तो उपस्थित होते. सायंकाळी ६.३० च्यादरम्यान कार्यकर्त्यांना आमदार वाघमारे यांच्या खोलीत साप असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी कुणीही आमदार तेथे उपस्थित नव्हता. कार्यकर्त्यांची आरडाओरड सुरू असताना साप दिसेनासा झाला.