श्रीदेवी जेव्हा नागपूर जिल्ह्यातील काटोलला येते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:23 AM2018-02-26T09:23:33+5:302018-02-26T09:23:42+5:30

मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील.

When Sridevi comes to Katalol in Nagpur district | श्रीदेवी जेव्हा नागपूर जिल्ह्यातील काटोलला येते...

श्रीदेवी जेव्हा नागपूर जिल्ह्यातील काटोलला येते...

googlenewsNext
ठळक मुद्देमुझे गांव देखना है..काटोल येथील बक्षीस समारंभ आटोपल्यानंतर श्रीदेवी यांनी तेथे उपस्थित ग्रामीण महिलांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्वत: चालत महिलांकडे गेल्या. त्यांच्याशी हिंदीतून हितगूज केले. त्यांच्या जीवनपद्धतीविषयी जाणून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीदेवी, राणी होती बॉलिवूडची. पैसा आणि प्रसिद्धीचा झगमगाट रात्रंदिवस अनुभवायची ती. पण, या झगमगाटाच्या पल्याड एक विरक्त कोपरा होता. जो दिसत नव्हता प्रेक्षकांना पडद्यावर. तो केवळ तिलाच जाणवायचा. या कोपऱ्यात ती, तिचे चौकोनी घर, जंगल, पहाड, नदी, गाव अन् मनशांतीची अनासक्त ओढ नांदायची. म्हणूनच नागपूरजवळच्या काटोलसारख्या छोट्या गावचे निमंत्रण मिळाले तेव्हा नकारासाठी तिच्याकडे कारणच नव्हते.
मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील. आख्यायिका ठरावी इतकी प्रसिद्धी लाभलेली ही देखणी अन् हसरी अभिनेत्री काल हे जग सोडून गेली आणि तिच्या नागपूर-काटोल भेटीच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. ही आठवण २००४ ची आहे. त्यांना ग्रामीण महिलांची मराठी नीट कळत नव्हती. पण, त्या महिलांच्या डोळ्यातील भाव त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या, हा किस्साही अनिल देशमुखांनी आवर्जून सांगितला.

जेवण साधेच हवे
श्रीदेवी ही मोठी अभिनेत्री आहे. तिच्या आदरातिथ्यात काही कमी राहू नये म्हणून देशमुख कुटुंबाने जय्यत तयारी केली होती. मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारच्या व्यंजनाचा बेत होता. श्रीदेवी प्रत्यक्ष जेवायला बसल्या तेव्हा काय वाढायचे त्यांना विचारण्यात आले. परंतु त्यांनी पोळी, वरण, भात आणि भाजी असे साधे जेवण मागितले. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाशी त्या खूपच जिव्हाळ्याने बोलल्या. तेव्हा प्रचंड स्टारडम लाभलेल्या या अभिनेत्रीच्या आतील एका साध्या स्त्रीचा अनुभव मला आला, अशा शब्दात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी श्रीदेवींच्या नागपूर भेटीची आठवण सांगितली.

त्यावेळी काटोल येथे विदर्भ यूथच्या अनुप खराडे यांनी महिलांची अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला श्रीदेवी यांनी यावे, असे त्यांना वाटत होते. राज्य सरकारमधील तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. याआधी ते चारपाचदा श्रीदेवींशी भेटले होते. त्यामुळे परिचय होताच. त्यांनी श्रीदेवींना याबाबत विचारले आणि गाव जवळून बघायला मिळणार या आनंदाने तिने हे निमंत्रण स्वीकारले. या निमित्ताने ती पहिल्यांदा नागपुरात आली. काटोलला रवाना होण्याआधी अनिल देशमुखांच्या बंगल्यावर थांबली. हे त्यांच्या चाहत्यांना कळताच श्रीदेवींची एक झलक पाहायसाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्यांनी त्यावेळेस या आरस्पानी सौंदर्यवतीला पाहिले होते त्या नागपूरकरांना तिच्या अशा अकाली जाण्याने मोठा धक्का बसला.

Web Title: When Sridevi comes to Katalol in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.