स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रसंतांचाच पुतळा झाकला जातो तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:19 PM2019-09-14T22:19:14+5:302019-09-14T22:21:19+5:30
२०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला. ज्या संतांनी जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला आणि ज्यांच्या नावे राज्य सरकार ग्रामस्वच्छता अभियान चालविते, त्यांचाच पुतळा फलक उभारल्याने झाकोळल्यामुळे गुरुदेवभक्तांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
येथील आग्याराम देवी चौकाजवळ सुभाष रोडवर श्री गुरुदेव सेवाश्रम आहे. स्वत: तुकडोजी महाराजांनी या आश्रमाची स्थापना केली होती. या आश्रमाकडून विविध उपक्रम चालविले जातात. काही वर्षापूर्वी आश्रमाच्या वतीने गुरुदेवभक्तांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारला. स्वखर्चाने त्या परिसराचे सौंदर्यीकरणही केले. आश्रमात रोज सकाळी ध्यान, प्रार्थना, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविले जातात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरुदेवभक्त ध्यान-प्रार्थनेसाठी आले असता महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठा डिजिटल फलक उभारलेला दिसला. त्यामुळे पुतळा, सौंदर्याकरण आणि पुतळ्यामागे लिहिलेला मानवतेचा संदेश झाकोळला होता. या संदर्भात गुरुदेवभक्तांनी अधिक माहिती घेतली असता, कसलीही अनुमती न घेता संबंधित जाहिरात कंपनीने रात्री हा फ लक लावल्याचे कळले. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून त्यांनी हा फलक हटविला. या घटनेचा सर्वच गुरुदेवभक्तांनी निषेध नोंदविला आहे.
मानवता आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे जाहिरात कंपनीकडून झालेले हे विद्रुपीकरण असून कंपनीच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. हा प्रकार अयोग्य आहे.
अशोक यावले, अध्यक्ष, श्री गुरुदेव सेवाश्रम, नागपूर
राष्ट्रसंतांनी आदर्श ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श ग्राम निर्माण योजना अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विद्यमाने राबविल्या. नागपुरातील मंडळही हे कार्य करीत आहे. मात्र त्यांच्याच आश्रमासमोरील पुतळा जाहिरात फलकाने झाकण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी.
रुपराव वाघ, गुरुदेव प्रचारक