-अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:45 AM2018-03-15T09:45:57+5:302018-03-15T09:46:06+5:30
अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उडालो. . ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते अन् चेहऱ्यावर होती स्मितमुद्रा.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९९५ साली मी नुकताच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधनिबंध प्रकाशित केला होता व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उडालो. समोरचे चित्र स्वप्नवत होते. ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते अन् चेहऱ्यावर होती स्मितमुद्रा. आश्चर्य म्हणजे, माझा शोधनिबंध वाचून जागतिक कीर्तीचा हा संशोधक मला भेटण्यासाठी व त्यांच्या मनातील एक शंका विचारण्यासाठी चक्क माझ्या दारी आला होता. साधे जीवन, उच्च विचार अन् नेहमी विद्यार्थ्यांसारखे पडणारे प्रश्न हीच बाब त्यांना महान बनवून गेली. कुणाच्याही आयुष्यात रोमांचक म्हणूनच गणना व्हावी, अशा या क्षणाची आठवण मूळचे भारतीय संशोधक डॉ. आतिश दाभोळकर यांनी फ्रान्सहून बोलताना ‘लोकमत’जवळ सांगितली.
तीन वर्षांपूर्वी डॉ. आतिश दाभोळकर यांनी त्यांच्या नागपूर भेटीत लोकमत भवनला भेट दिली होती. यावेळी त्यांनी डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्याबाबतच्या या प्रसंगाची माहिती दिली होती. दरम्यान स्टीफन हॉकिंग यांच्या निधनानंतर बुधवारी दाभोळकर यांनी त्यांच्या या आठवणींना सविस्तर उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ.स्टीफन हॉकिंग यांच्याबाबत त्यांनी मांडलेल्या विविध शोधपत्रिका वाचून उत्सुकता निर्माण झाली होती. १९९५ साली मी ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये असताना ‘स्ट्रींग थिअरी’वरील माझा शोधनिबंध वाचून डॉ. हॉकिंग मला शोधत माझ्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी शोधनिबंधातील विविध वैज्ञानिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर डॉ.हॉकिंग यांच्याशी अनेकदा संपर्क येत गेला. ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या मुद्यांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता व त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक गोष्टी कळत गेल्या. विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने यांच्या माध्यमातून त्यांचे सानिध्य लाभल्याचा नक्कीच अभिमान वाटतो, असेही डॉ.दाभोळकर यांनी सांगितले.
दुसरी आठवण म्हणजे, डॉ. दाभोळकर यांच्या प्रयत्नांतून डॉ.स्टीफन हॉकिंग २००१ साली मुंबईत झालेल्या ‘स्ट्रींग’ला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांचे सायन येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते. डॉ.हॉकिंग यांना भारतीय संशोधकांविषयी विशेष आदर होता. जगभरात भारतीय संशोधक भौतिकशास्त्र, गणित, ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कार्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते नेहमी भारतीयांबाबत गौरवोद्गार काढायचे, असे डॉ.दाभोळकर यांनी सांगितले.
‘जिंदादिल’ होते ‘हॉकिंग’
जगाने नेहमी व्हीलचेअरवर बसलेले व विचारात गुंतलेले हॉकिंग पाहिले. मात्र त्यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास आणि काहीसे मिश्किलदेखील होते. स्वत:च्या मर्जीने ते हलू शकत नसतानादेखील समोरच्याला जगण्याची कला शिकवून जात. गंभीर वातावरणातदेखील हळूच एखादा ‘जोक’ ऐकवत सर्वांना हसायला भाग पाडत. एका मुलीला ‘मल्टिपल सेरॉसिस’ने ग्रासले होते व तिच्या आजोबांनी मला त्या मुलीवर लिहिलेली कविता डॉ.हॉकिंग यांना पाठविण्याची विनंती केली होती. मी अगदी सहज म्हणून त्यांना ती पाठविली व काही वेळातच त्या कवितेचे कौतुक करणारा त्यांना ‘मेल’ आला. डॉ.हॉकिंग हे महान संशोधक तर होतेच मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे माणुसकी जपणारे ‘जिंदादिल’ व्यक्ती होते, अशी भावना डॉ.आतिश दाभोळकर यांनी व्यक्त केली.
कोण आहेत डॉ.आतिश दाभोळकर ?
‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून डॉ.आतिश दाभोळकर यांची गणना होते. सद्यस्थितीत ते फ्रान्समधील ‘इंटऱनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स’ येथे ‘हाय एनर्जी, कॉस्मॉलॉजी व अॅस्ट्रोपार्टिकल फिजिक्स’ विभागाचे प्रमुख आहेत. सोबतच पॅरिस येथील ‘सीएनआरएस’चे (नॅशनल सेंटर फॉर रिसर्च सायन्स) संचालक आहेत. डॉ.दाभोळकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ.नरेंद्र दाभोळकर हे त्यांचे काका होते व वडील श्रीपाद दाभोळकर यांनीदेखील ‘प्रयोग परिवार’च्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे.