कधी थांबतील अत्याचार

By admin | Published: March 21, 2016 02:32 AM2016-03-21T02:32:57+5:302016-03-21T02:32:57+5:30

उपराजधानीतील गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यासाठी पोलिसांनी मोक्काचे अस्त्र उगारले आहे. अनेक बड्या गुन्हेगारांवर

When the stop atrocity | कधी थांबतील अत्याचार

कधी थांबतील अत्याचार

Next

नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यासाठी पोलिसांनी मोक्काचे अस्त्र उगारले आहे. अनेक बड्या गुन्हेगारांवर आणि त्यांच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. महिला अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. तरीसुद्धा शहरातील महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत.
आठवड्यात किमान दोन बलात्काराच्या घटना घडत आहेत. महिला-मुलींना मारहाण करणे, त्यांची छेड काढणे, अश्लील टोमणे मारून विनयभंग करण्याचे गुन्हे रोजच कुणा ना कुण्या पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे समाजमन चिंतित आहे. गेल्या २४ तासात सामूहिक बलात्कारासह बलात्काराचे दोन आणि विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे कधी थांबणार अत्याचार असा केविलवाणा प्रश्न समाजातून, महिला-मुलींकडून विचारला जात आहे.(प्रतिनिधी)

सोनेगावात विवाहितेवर
सामूहिक बलात्कार
महिलेचा पती कारागृहात असल्याची संधी साधून दोघांनी एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ ते १० मार्चच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली. मात्र, पती कारागृहातून बाहेर आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पीडित महिला ३० वर्षांची आहे. तिचा पती चोरीच्या प्रकरणात कारागृहात बंदिस्त होता. त्याचे मित्र संजू भलावी आणि मनोज पुरके हे दोघेही खापरी झोपडपट्टीत राहतात. भलावी ट्रक चालवतो तर पुरके मजुरी करतो.
ते नेहमीच महिलेच्या घरी यायचे. पतीचे मित्र असल्यामुळे महिलेलाही त्याचे काही वाटत नव्हते. नेहमीप्रमाणे ९ मार्चला रात्री ११ वाजता भलावी आणि पुरके महिलेच्या दारासमोर आले. प्यायला पाणी पाहिजे, असे सांगितल्यामुळे महिलेने दार उघडले. यावेळी महिला आपल्या तीन वर्षीय मुलासह घरात होती. दोघेही आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध घातले. ते पाणी महिलेला पाजल्यानंतर तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या वेळी शेजारच्या एका तरुणाला विचित्र आवाज आल्याने त्याने डोकावून बघितल्यानंतर त्याला नको तो प्रकार दिसला. त्याने सकाळी महिलेला याबाबत विचारणा केली. महिलेचा पती कारागृहात असल्यामुळे तिने गप्पच राहणे पसंत केले. तो परतल्यानंतर त्याला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

काका चंडोकच्या
मुसक्या बांधणार
महिला-पुरुषांच्या विरोधात फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्या कुख्यात काका ऊर्फ रणवीरसिंग गुरुचरणसिंग चंडोक याच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला काका चंडोक याची जरीपटक्यात प्रचंड दहशत आहे. विविध जातीधर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज तो नियमित फेसबुकवर टाकतो. आॅगस्ट २०१३ पासून त्याचे हे संतापजनक कृत्य सुरू आहे. मात्र, त्याच्या दहशतीमुळे कुणी त्याची तक्रार द्यायला धजावत नाही. पीडित महिलेच्या मुलाच्या मोबाईलवर चंडोकने महिलेसह तिच्या नात्यातील महिला-मुलींसंबंधातही अश्लील संदेश टाकले आहे. ते वाचून पीडित महिलेने प्रारंभी जरीपटका ठाण्यात तक्रार द्यायचा प्रयत्न केला. मात्र, जरीपटका पोलिसांचे काका चंडोकशी मधूर संबंध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळून महिलेलाच बदनामीचा धाक दाखविल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांसह पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. वरिष्ठांनी तिची कैफियत ऐकल्यानंतर हे प्रकरण परिमंडळ - २ च्या उपायुक्तांकडे सोपवले. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्यातून महिलेला न्याय मिळणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे प्रकरण पाचपावली ठाण्याला सोपविण्यात आले. ठाणेदार राजू बहादुरे यांनी शनिवारी दुपारी पीडित महिलेची तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर उपनिरीक्षक जी.आर. भोसले यांनी कुख्यात काका चंडोकविरुद्ध कलम ३५४(अ), २९५(अ) भादंवि, तसेच सहकलम ६७ (अ) आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला.

अजनीत तरुणीला फसविले
आदिवासी तरुणीशी लग्न करण्याचा बनाव करून तिला आई बनविणाऱ्या आरोपीने दुसऱ्याच मुलीशी घरठाव केला. मोहम्मद अशरफ मोहम्मद अफजल (वय २६, रा. हुडको कॉलनी, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. अशरफ भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. अजनीतील तरुणीशी (वय २५) त्याची २०१३ मध्ये ओळख झाली. त्याने तिच्यावर प्रेमजाळे टाकले. त्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध जोडले. दोन वर्षांपूर्वी तिला गर्भधारणा झाल्यामुळे तिने अशरफकडे लग्नाचा हट्ट धरला. यावेळी त्याने तिच्याशी लग्नाचा बनाव केला. खर्चासाठी तरुणीच्या आईकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. १६ महिन्यांपूर्वी तरुणीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर अशरफ काही महिने तिच्याशी चांगला राहिला. आॅक्टोबर २०१५ पासून तो तिला टाळू लागला. तरुणीने आपल्या आईकडे मुलीचे संगोपन केले. आता तिची मुलगी १६ महिन्यांची झाली आहे. अशरफ टाळत असल्याने संशय आल्यामुळे तरुणीने चौकशी केली असता त्याने दुसरे लग्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तरुणीने अशरफच्या वडिलांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांनी तिला धीर देण्याऐवजी आरोपी अशरफच साथ देत तरुणीला हाकलून लावले.

Web Title: When the stop atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.