दहशतवादी न्यायालयात शिरतात तेव्हा...

By admin | Published: June 25, 2016 02:57 AM2016-06-25T02:57:44+5:302016-06-25T02:57:44+5:30

‘आता आता चार दहशतवाद्यांनी जिल्हा न्यायालयाच्या दगडी इमारतीतील न्यायालय क्रमांक सहामध्ये घुसून न्यायाधीश, कर्मचारी आणि इतरांना ओलीस ठेवले आहे.

When terrorists enter court | दहशतवादी न्यायालयात शिरतात तेव्हा...

दहशतवादी न्यायालयात शिरतात तेव्हा...

Next

मॉक ड्रील : अन् सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
नागपूर : ‘आता आता चार दहशतवाद्यांनी जिल्हा न्यायालयाच्या दगडी इमारतीतील न्यायालय क्रमांक सहामध्ये घुसून न्यायाधीश, कर्मचारी आणि इतरांना ओलीस ठेवले आहे. त्यांच्याजवळ आधुनिक रायफली आणि आरडीएक्स आहे, ताबडतोब तेथे पोहोचा आणि ही माहिती कन्फर्म करून त्वरित कळवा’ अचानक बिनतारी संदेश यंत्रणेवर हा संदेश धडकला.
तत्पूर्वी याच न्यायालयातील ‘मोहरील’ ड्युटीवरील एका पोलीस कर्मचाऱ्याने सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांना आपल्या मोबाईल फोनवरून घाबरतच न्यायालयात दहशतवादी घुसल्याची माहिती दिली. सिडाम यांनी लागलीच ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला आणि सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना दिली. दहशतवाद्यांनी न्यायालय क्रमांक सहाचा ताबा घेतल्याचे कन्फर्म होताच क्षणात जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारे रस्ते सील करण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्षापुढे सदैव तैनात असलेले जलद कृती दलाचे कमांडो पथक न्यायालयाच्या दिशेने सरसावले. बॉम्ब शोधक-नाशक पथक आपले खास प्रशिक्षित श्वान आणि अत्याधुनिक यंत्रणेसह न्यायालयाच्या दगडी इमारतीनजीक दाखल झाले. त्यामागेच सायरन वाजवीत अग्निशामक दलाची दोन वाहने आणि अ‍ॅम्बुलन्सही घटनास्थळी धडकली. काही तरी भयानक घडत आहे म्हणून न्यायालय आवारातील नेहमीच्या गर्दीतील माणसे घाबरून बाहेर निसटू लागली. वकील मंडळीही ‘क्या हुआ’ म्हणत पळून जाऊ लागले. न्यायालय सुरक्षा चौकीतील पोलिसांची एकच तारांबळ उडली. सायरनच्या आवाजासह ही कुमक न्यायालय आवारात दाखल झाली. न्यायालयात दहशतवादी घुसल्याच्या माहितीने सामान्य जण थरारून गेले होते. काही वेळातच कमांडो पथकाने चार दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधून बाहेर आणले. श्वानाने आरडीक्स हुडकून काढले. स्फोटकेरोधक गणवेशातील एका पोलीस जवानाने आरडीक्सचा साठा एका खास ‘ बॉक्स’ मध्ये बंद करून तो निष्प्रभ करण्यासाठी पिटेसूर खाणीकडे खास वाहनातून रवाना केला. हा थरारक प्रकार ‘मॉक ड्रिल’ असल्याचे स्पष्ट होताच जीव मुठीत घेऊन असलेल्या न्यायालय आवारातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळी ५.४० पर्यंत ही मॉक ड्रील सुरू होती.(प्रतिनिधी)

न्यायालयातील पहिलीच मॉक ड्रील
पत्रकारांशी बोलताना सहायक पोलीस आयुक्त वाघचौरे यांनी सांगितले की, सावधगिरी आणि अति सतर्कता म्हणून ही मॉक ड्रील घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील ही पहिलीच मॉक ड्रील असावी. यात १५० पोलीस जवानांचा सहभाग होता. त्यात ३० जवान साध्या वेशात होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांची पूर्वपरवानगी घेऊनच ही मॉक ड्रील घेण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: When terrorists enter court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.