रेल्वेत प्रसुती वेदनेने विव्हळत महिलेच्या मदतीला त्या धावून जातात तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 08:30 PM2018-09-29T20:30:01+5:302018-09-29T20:33:37+5:30
सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सकाळी एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. गाडी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच संबंधीत महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेस्थानकावरील महिला कुली या महिलेच्या मदतीस धावल्या. परंतु प्रसुतीस वेळ असल्यामुळे या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळच्या वेळी या महिलेने मुलाला जन्म दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सकाळी एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना सुरू झाल्या. गाडी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच संबंधीत महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेस्थानकावरील महिला कुली या महिलेच्या मदतीस धावल्या. परंतु प्रसुतीस वेळ असल्यामुळे या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळच्या वेळी या महिलेने मुलाला जन्म दिला.
सोनी सनबहादुर मोर्या (३६) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह बी ४ कोचच्या ३४ क्रमांकाच्या बर्थवरून सिकंदराबाद ते गोरखपूर असा प्रवास करीत होती. नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या महिलेस प्रसुती वेदना सुरू झाल्या. गाडीतील टीटीईने याची माहिती नागपूर रेल्वेस्थानकावरील उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण केले. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर येताच या महिलेस खाली उतरविण्यात आले. रेल्वेच्या डॉ. सौजन्या यांनी या महिलेची तपासणी केली असता प्रसुतीस आणखी वेळ असल्याचे लक्षात आले. दरम्यान रेल्वेस्थानकावरील महिला कुली रुणाली राऊत, विशाखा डबले, आरपीएफच्या महिला या महिलेच्या मदतीसाठी धावल्या. परंतु प्रसुतीस वेळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सायंकाळच्या सुमारास या महिलेने मुलाला जन्म दिला. रेल्वेस्थानकावर प्रसुती होण्याची पाच दिवसातील ही तिसरी घटना आहे.