पगार कधी देणार, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल

By नरेश डोंगरे | Published: July 11, 2024 10:51 PM2024-07-11T22:51:40+5:302024-07-11T22:52:24+5:30

अनेकांसमोर प्रश्न, विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

When to pay salary, how to drive the family car? Question of angry ST employees | पगार कधी देणार, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल

पगार कधी देणार, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महिन्याच्या पगाराच्या नियोजित तारखेनंतर आणखी ४ दिवस झाले तरी पगार पदरात पडला नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हक्काचे मासिक वेतन तातडीने मिळावे, या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या संतप्त कामगारांनी गुरुवारी विभागीय कार्यालयासह वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली.

राज्य सरकारकडून लाखो रुपयांच्या वेगवेगळ्या योजनांची खैरात वाटली जात आहे, वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही.

एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळतो. सरकारच्या अन्य खात्यांच्या तुलनेत सुविधांची देखील वानवा आहे. त्यांच्या हक्काच्या अनेक मागण्यांना प्रत्येक वेळी आश्वासन देऊन प्रलंबित ठेवले जाते. अशात त्यांना किमान वेळेवर वेतन मिळावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही. यावेळी तर कळसच झाला आहे. आज ११ तारीख आली मात्र कर्मचाऱ्यांना एसटीकडून पगार मिळालेला नाही. परिणामी रोजच्या अत्यावश्यक गरजा कशा भागवायच्या आणि परिवाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न एसटी कामगारांना पडला आहे.

संतप्त झालेल्या एसटी महामंडळाच्या कामगार युनियनच्या कृती समितीने गुरुवारी विभागीय कार्यालये, कार्यशाळा तसेच आगारांमध्ये निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला. या निदर्शनात एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तातडीने वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एसटी कामगार संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी दिला आहे.

Web Title: When to pay salary, how to drive the family car? Question of angry ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.