कर्मचाऱ्यांना जेव्हा तुकाराम मुंढे स्वत: फोन करतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 07:00 AM2020-08-10T07:00:00+5:302020-08-10T07:00:07+5:30
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. जोराचा पाऊस झाल्यास तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल्स येऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या कॉल्सची वाट न पाहता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महापालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. तसेच प्रसंगी उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
रविवारी शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मुसळधार पाऊस आला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर गाठायला लावले. कॅमेºयाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समस्या दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तुकाराम मुंढे यांनी लाईव्ह फुटेजवरून ज्या ठिकाणी समस्या दिसली तेथे तातडीने संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना पाठविले. स्वत: मोबाईलवरून संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली. पुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काय करायला हवे, याबाबत त्यांनी त्या कर्मचाºयाकडूनच माहिती घेत त्याप्रमाणे कार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील आपात्कालीन परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी मनपाद्वारे झोन स्तरावर विविध टीम गठित करण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरावर भर
शहरातील ज्या समस्या आहे, त्या सोडविण्यासाठी आता उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. मनपा मुख्यालयात उभारण्यात आलेले सिटी ऑपरेशन सेंटर हे केवळ अपघातावर नियंत्रण किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही तर मनपाची यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. सफाई कामगारांच्या कार्यावर आणि स्वच्छतेवर नजर ठेवण्यात येत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले.