निसर्गाची सुरेल भावना कॅनव्हॉसवर उतरते तेव्हा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 09:17 PM2020-02-22T21:17:15+5:302020-02-22T21:19:04+5:30
अनेक पुरातन मंदिरे, किल्ले भग्न पडले असले तरीे संमोहित करतात ते अवतीभवतीच्या निसर्गामुळे. हौशी गायक म्हणून ओळख असलेले अरुण नलगे यांच्या कल्पनेतून निसर्गाचे हेच सौंदर्य जेव्हा कॅनव्हॉसवर उतरले तेव्हा त्याला एक सुरेल रूप प्राप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्ग आणि मानवाचा संबंध अतूट असा आहे आणि तो प्रत्येक रूपात आकर्षित करून घेतो. उन्हात चालताना रस्त्याच्या कडेला असलेले शाल वृक्ष हवेहवेसे वाटावे तसे. निसर्ग निर्मितीची तुलना कुणाशी होऊ शकत नाही पण अनेकदा मानवनिर्मित वास्तूही निसर्गाचा भाग असल्याचे जाणवते. अनेक पुरातन मंदिरे, किल्ले भग्न पडले असले तरीे संमोहित करतात ते अवतीभवतीच्या निसर्गामुळे. हौशी गायक म्हणून ओळख असलेले अरुण नलगे यांच्या कल्पनेतून निसर्गाचे हेच सौंदर्य जेव्हा कॅनव्हॉसवर उतरले तेव्हा त्याला एक सुरेल रूप प्राप्त झाले.
अरुण नलगे या हौशी चित्रकाराचे निसर्ग व मानवाचा भावनिक संबंध दर्शविणारे चित्रप्रदर्शन शनिवारी लोकमत भवन स्थित जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत भरविण्यात आले. स्वरवेदचे अॅड. भानुदास कुळकर्णी, दिलीपराव सांबरे तसेच अरुण नलगे यांच्या पत्नी नंदा नलगे यांच्यासह कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या एकदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. नलगे यांची हौशी चित्रकार म्हणून ओळख होण्याचे कारण त्यांनी कुठेही चित्रकारितेचे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले नाही. चित्र काढणे हा त्यांचा बालपणापासूनचा छंद. नंतरच्या काळात शिक्षक व पुढे मुख्याध्यापक म्हणून सेवा देताना ही हौस मागे पडली होती. मात्र निवृत्तीनंतर त्यांच्या या छंदाला पंख फुटले. दरम्यान, लहानमोठ्या संगीत कार्यक्रमात गायक म्हणून वावरताना त्यांच्यातील चित्र प्रतिभा फारशी कुणाला जाणवली नाही, मात्र या प्रदर्शनातून त्यांच्यातील वेगळी कलात्मकता जगासमोर आल्याची भावना अॅड. कुळकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.
आसपास दिसणारा निसर्ग आणि त्यात गुंतलेले मानवी अवशेष हा त्यांच्या चित्रकारितेचा विषय. ब्रश हातात घेतला की चित्र आपोआप साकारत जाते, या त्यांच्या मनोगताप्रमाणे व्यावसायिक चित्रकारांसारखी त्यांच्याही चित्रांची भुरळ बघणाऱ्यास पडते. अमरकंटकचे परिक्रमेचे स्थान, चित्रकुट धाम, कान्हा रिसोर्ट, बुंदेलखंड, मांडवगडचे राजेशाही किल्ले, रामटेकचे गडमंदिर, टेकडी गणेश मंदिर, अजिंठ्याचे पद्मपानी बुद्ध त्यांनी सुरेख साकारले आहेत. शिवाय वादळात फसलेल्या नौकेच्या अतिशय प्रभावी चित्रणातून त्यांच्यातील कसब पाहणाऱ्यांना जाणवते. त्यांचेच एक चित्र साकारल्यानंतर त्यांना कवी गे्रसांच्या कवितेप्रमाणे वाटले तर एका चित्रात अमेरिकेतील अनिवासी भारतीय डॉक्टर महिलेला तिचे स्वत:चे आयुष्य सापडल्याचे ते सांगतात. एखाद्या गायकाला सूर लागावा तसा त्यांच्या चित्रांमधला आशय बाहेर येतो, हेच त्यांच्या चित्रातले सुरेखपण आहे.