बाजारगाव पोलीस स्टेशनला मंजुरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:23+5:302021-03-06T04:09:23+5:30
काटोल : नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरणासोबतच ...
काटोल : नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरणासोबतच बाजारगाव परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे गाव कोंढाळी पोलीस स्टेशनअंतर्गत येते.
बाजारगावलगत डिगडोह, अडेगाव, सातनवरी, कातलाबोडी अशी अनेक मोठी गावे आहेत. या भागाचे वाढते औद्योगिकीकरण पाहता येथील गुन्हेगारीवरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे. कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांची संख्या व त्यांची सीमा पाहता तक्रार निवारण करणे व वेळेत घटनास्थळी पोहचणे अनेकदा पोलिसांनासुद्धा शक्य होत नाही. म्हणून बाजारगाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी बाजारगाव येथे पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रस्ताव पाठवूनही अद्याप कोणतीच ठोस अशी हालचाल प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही. बाजारगाव हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रात मोडते. गत नोव्हेंबर महिन्यात देशमुख यांनी शिवासावंगा येथील भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांना बाजारगाव येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. यात त्यांनी महिनाभरात पोलीस स्टेशन निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे स्पष्ट केले होते.