हॉटेल कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:03+5:302021-08-24T04:12:03+5:30
श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : कोरोनापासून बचावाचा एकमेव मार्ग प्रतिबंधात्मक लसीकरण हाच असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ...
श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : कोरोनापासून बचावाचा एकमेव मार्ग प्रतिबंधात्मक लसीकरण हाच असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळेच देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसीचा तुटवडा हा गटातील मोठा अडसर आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. राज्यात १५ ऑगस्टपासून हॉटेल्स-दुकाने रात्री दहापर्यंत उघडी ठेेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. मात्र यात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण पूर्णपणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. तरी अजूनही तालुक्यातील हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले दिसत नाही. तसेच रस्त्यावरील टपरीधारकांचे लसीकरण बाकी आहे. तालुक्यात २५० च्या जवळपास हॉटेल्स व टपऱ्या आहेत. मोठ्या हॉटेलमध्ये चार-पाच कर्मचारी काम करतात. टपरीवर एक-दोघे कर्मचारी असतात. हॉटेल चालक, कर्मचारी सुपरस्प्रेडर आहेत. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील टपऱ्यांवर आनंदी आनंदच!
संसाराचा गाडा चालविण्याकरिता शहरातील मोक्याच्या ठिकाणी अनेक बेरोजगार, गरजूंनी चहाच्या टपऱ्या टाकल्या आहेत. परंतु आजमितीस अनेकांचे लसीकरण केलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
--
हॉटेल १ : नरखेड येथील बस स्थानक चौकातील हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे, तर काहींचा दुसराही डोस पूर्ण केला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन काही प्रमाणात करण्यात येत आहे.
हॉटेल २ :- नरखेड येथील गांधी चौकातील हॉटेलमध्ये ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्याचे दोन्ही डोस झाले असून १८ वर्षांवरील कर्मचाऱ्यांचा पहिला डोस झाला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले.
----
लसीच्या तुटवड्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्रावरून कर्मचाऱ्यांना परत यावे लागते. सकाळी कामाला येतात, घरी जाईपर्यंत त्यांना रात्रच होते. कामाची वेळ व लसीकरणाची वेळ एकच आहे. त्यामुळे प्रशासनाने फक्त हॉटेल कर्मचाऱ्यांकरिता दिवस व वेळ निश्चित करून दिल्यास लसीकरण सोयीचे होईल. आतापर्यंत जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केल्याचा अंदाज आहे.
- महेश मोहने, हॉटेल व्यावसायिक, नरखेड
--
शासनाकडून कमी-अधिक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होत आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे हॉटेल व्यावसायिक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात लस घेत आहेत. सर्व सुपरस्प्रेडरना वारंवार सूचना देण्यात येते. ८० टक्के सुपरस्प्रेडरचे लसीकरण केले आहे.
- प्रवीण मानकर, मुख्याधिकारी, नरखेड.