केव्हा होणार १३ झोन?
By admin | Published: April 20, 2015 02:11 AM2015-04-20T02:11:08+5:302015-04-20T02:11:08+5:30
शहराची वाढती लोकसंख्या व नवीन कायद्यानुसार सुरू झालेला महापालिकेचा कारभार, याचा विचार करता कामकाजाच्या दृष्टीने नवीन तीन झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
नागपूर : शहराची वाढती लोकसंख्या व नवीन कायद्यानुसार सुरू झालेला महापालिकेचा कारभार, याचा विचार करता कामकाजाच्या दृष्टीने नवीन तीन झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच असल्याने केव्हा होणार १३ झोन असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
दोन वर्षांपूर्वी मनपाचा कारभार एमएमसी कायद्यानुसार सुरू झाला. या कायद्यानुसार दीड लाख लोकसंख्येमागे एक झोन असायला हवे. त्यानुसार शहराची लोकसंख्या विचारात घेता १३ झोनची गरज आहे. सध्या १० झोन असल्याने तीन नवीन झोनचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा तसाच पडून असून गेल्या दोन वर्षात यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही.
हुडकेश्वर-नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आला. त्यामुळे नेहरूनगर व हनुमाननगर झोनचे काम वाढले आहे. वास्तविक प्रभागातील नागरिकांना लहानसहान कामासाठी मनपा कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांची कामे झोन स्तरावरच व्हावी, या हेतूने १० झोनची निर्मिती करण्यात आली. यात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी आदींचा यात समावेश आहे. मागील काही वर्षात नागपूर शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असल्याने लोक संख्येतही वाढ होत आहे. ही बाब विचारात घेता लोकांच्या समस्या व प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी नवीन तीन झोनची निर्मिती होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)