अश्लीलता फैलावणाऱ्या महिलांवर केव्हा होणार कारवाई?

By नरेश डोंगरे | Published: May 18, 2024 05:46 PM2024-05-18T17:46:53+5:302024-05-18T17:48:11+5:30

Nagpur : या विकृतीवर कायद्याचा हंटर कधी चालणार ?

When will action be taken against women who spread obscenity? | अश्लीलता फैलावणाऱ्या महिलांवर केव्हा होणार कारवाई?

When will action be taken against women who spread obscenity?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
तरुण असू दे, किंवा म्हातारा, एखाद्या पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी जरा का असे तसे वर्तन केले, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार होतो. नेटिजन्स त्याला अक्षरश: (ऑनलाईन) बदडून काढतात. पोलिसही कुण्या तक्रारदाराची वाट बघण्याच्या भानगडीत पडत नाही. सामाजिक वातावरण दूषित केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. अनेकदा विनयभंगासारखा गुन्हा दाखल होतो. अन् पोलिस त्याला कोठडीत 'सुंदरी आणि बाजीराव' दाखवितात. हे सर्व आवश्यकही आहे. कारण तसे झाले नाही तर मानसिक विकृती घेऊन फिरणारे समाजकंटक जिकडे तिकडे अश्लील थैमान घालतील. त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा चाबूक पडलाच पाहिजे. पुरुषांप्रमाणेच अश्लीलता पसरविणाऱ्या महिलांवरही अशीच कडक कारवाई व्हावी, अशीही चर्चा आता समाजमन करू लागले आहे. अलीकडच्या काही प्रकरणातून त्याची गरज अधोरेखित झाली आहे.

अश्लीलता म्हणा की मानसिक विकृती, प्रसंगानुरूप हा विषय अधूनमधून नेहमी चर्चेला येतो आणि नंतर विरूनही जातो. आता तो चर्चेला येण्याचे कारण म्हणजे, एका पेट्रोल पंपावरचा व्हायरल झालेला व्हिडीओ होय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खुप व्हायरल होत आहे. तो कुठला आहे, कळायला मार्ग नाही. मात्र, एका पेट्रोल पंपावर दुचाकीवर आलेली तरुणी पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यासमोर चक्क जिन्स उतरविताना दिसत आहे. तिच्या या निर्लज्ज कृत्याची नेटकऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तिच्यावर सडकून टीकाही चालविली आहे. मुद्दा तिचा एकटीचा नाही. याहीपेक्षा भयंकर प्रकार नागपुरात यापूर्वी घडले आहेत.

((१))
२४ तास वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-वर्धा महामार्गावर, विमानतळाच्या पुढ्यात एक पब आहे. येथे रात्रीला तरुण-तरुणींच्या उड्या पडत असतात. तेथे एंट्री मिळावी, असा हट्ट एका युवतीने काही महिन्यांपूर्वी धरला होता. बाउन्सरने तो फेटाळल्याने ती अशी काही चिडली की तिने बाउन्सरला नको त्या शिव्या घातल्या. अश्लीलता येथेच संपली असती तर ठीक होते. मात्र, त्यापुढचे पाऊल टाकत तिने स्वत:च्या अंगावरचे कपडे उतरवून बाउन्सरला तसेच समोर जमलेल्या गर्दीला डोळ्यावर हात नेण्यास, पळून जाण्यास भाग पाडले होते.

((२))
असाच काहीसा प्रकार मुंबईत लोकल ट्रेनमध्येही काही महिन्यांपूर्वी घडला होता. एका स्थानकावर लोकल थांबताच एक तरुणी अचानक अश्लील नृत्य करू लागली. तिचे ते चाळे बघून आजूबाजूच्या महिला पटपट ट्रेनमधून उतरल्या. काहीजणी बाजूला झाल्या. हा प्रकार चर्चेला आल्यानंतर चाैकशी सुरू झाली. दरम्यान, सोशल मीडियावर रिल्स अपलोड करण्यासाठी, लाईक मिळविण्यासाठी या तरुणीने स्वत:चा हा अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा अंदाज नंतर संंबंधितांकडून चर्चेला आला होता.

((३))
गेल्या महिन्यात एका विकृत वृत्तीच्या तरुणाने नागपुरात कहर केला. चक्क विवस्त्रावस्थेत या तरुणाने स्कूटरवरून शहराची सफर केली. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरांचा बेफिकिरीने सामना करीत तो स्कूटर दामटत होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या निर्लज्ज तरुणाला नंतर पोलिसांनी हुडकून काढले. मात्र, पोलिसांच्या कारवाईचे स्वरूप जुजबीच होते. तुलनेत त्याच्यावर नेटिजन्सनी केलेला टीकेचा भडिमार अधिक तीव्र स्वरूपाचा होता.

नमूद उदाहरणांवरून ही विकृती सर्वत्र सारख्याच प्रमाणात वळवळत असल्याचे स्पष्ट होते. त्यांना महामार्ग असो, पेट्रोल पंप असो, रेल्वे गाडी असो, की महानगरातील कोणतेही गर्दीचे ठिकाण. त्यांच्यावर फारसा काही फरक पडत नाही. उलट त्यांना गर्दीच्या ठिकाणीच विकृतीचे प्रदर्शन करणे आवडते, असेच यातून दिसून येते. त्यामुळे आता पुरुष असो की महिला, सार्वजनिक ठिकाणी जो कुणी विकृत चाळे करेल, त्याच्यावर कायद्याचा कडक हंटर चालविणे आवश्यक ठरावे.
 

Web Title: When will action be taken against women who spread obscenity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.