कृषी विभागाच्या इमारतीचे बांधकाम करणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:37+5:302021-09-04T04:12:37+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काटाेल शहरात कृषी विभागाची उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ ...
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काटाेल शहरात कृषी विभागाची उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी अशी तीन कार्यालये आहेत. काटाेल शहरातील या कार्यालयांचा कारभार कृषी विभागाच्या निर्मितीपासून आजवर किरायाच्या इमारतींमधून सुरू आहे. या विभागाला स्वत:ची इमारत बांधून देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी मंजुरी दिली. जागा उपलब्ध असताना निधीअभावी हे काम तसूभरही पुढे गेले नाही. निधी प्राप्त व्हावा, यासाठी लाेकप्रतिनिधी व नेते काही करायला तर अधिकाऱ्यांची मागणी कुणी मनावर घ्यायला तयार नाही.
कृषी विभागाने काटाेल शहरातील त्यांच्या जागेवर कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव ११ नाेव्हेंबर २०१४ राेजी राज्य सरकारकडे पाठविला हाेता. तत्पूर्वी ही कार्यालये सन २०१३ पासून किरायाच्या इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्यात आली. या इमारतींच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१४-१५ मध्ये ५२ लाख ११ हजार ७०० रुपयांचा आराखडा तयार केला. सरकारने त्याला मंजुरीही दिली; परंतु निधी उपलब्ध करून दिला नाही.
पुढे कृषी विभागाने ५ मार्च २०२० राेजी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुधारित आराखडा तयार करण्याबाबत पत्र दिले. त्या पत्राची दखल घेण्यास बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अद्याप फुरसत मिळाली नाही. माेडकळीस आलेल्या कृषी विभागाच्या त्या इमारतीचा वापर काही शाैकिन अनैतिक कामांसाठी करतात. शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागतात. शासनाला इमारतीच्या किरायापाेटी वर्षात ५ लाख ७६ हजार रुपये खर्च करावे लागते, याचे साधे वैषम्यही कुणाला वाटत नाही.
...
कार्यालयांची व्याप्ती
काटाेल येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाला काटाेल, नरखेड व कळमेश्वर हे तीन तालुके जाेडले आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला काटाेल तालुक्यातील मेटपांजरा, काेंढाळी, काटाेल व पारडसिंगा ही चार मंडळ कृषी अधिकारी कार्यालये जाेडली आहेत. ही चारही कार्यालये काटाेल शहरातच आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांना त्रास हाेत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपसात समन्वय ठेवण्यासाठी अडचणी येतात.
...
५.७६ लाख रुपये किराया खर्च
तालुका कृषी अधिकारी कार्यालय व काेंढाळी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये असून, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यालये किरायाच्या इमारतीत आहेत. उविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचा किराया दरमाह १९ हजार रुपये तर तिन्ही मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांचा किराया दरमाह २९ हजार रुपये आहे. त्यामुळे या विभागाला किरायापाेटी दर महिन्याला ४८ हजार रुपये दर वर्षाकाठी ५ लाख ७६ हजार रुपये खर्च करावे लागतात.
...
३९०.८२ चाैरस मीटर जागा उपलब्ध
पूर्वीचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहरातील मुख्य मार्गालगतच्या कन्या शाळेजवळ हाेते. ही ३९०.८२ चाैरस मीटर जागा कृषी विभागाच्या मालकीची असून, येथील इमारती माेडकळीस आल्या आहेत. याच जागेवर कृषी विभागाच्या सहा विभागाच्या स्वतंत्र इमारतींचे किंवा एकाच माेठ्या इमारतीत सहा वेगवेगळी सुसज्ज व प्रशस्त कार्यालये सुरू करणे सहज शक्य आहे.
....