बोरगाव-गिट्टीखदान सिमेंट रोड कधी पूर्ण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:11 PM2019-02-20T23:11:05+5:302019-02-20T23:12:13+5:30
शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्याप अर्धाही रस्ता झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्याप अर्धाही रस्ता झालेला नाही. ज्या रस्त्याचे काम झाले तो सुद्धा अर्धवट असाच आहे. त्यामुळे येथील रस्ता शहरात आयआरडीपीचे रस्ते झाले तेव्हा गिट्टीखदान ते गोरेवाडा या रस्त्यालाही मंजुरी मिळाली होती. रस्ता आखणी करून अतिक्रमणही हटवण्यात आले होते. दोन्ही बाजूंला फूटपाथही बनवण्यात आले होते. परंतु रस्त्याचे काम मात्र झाले नाही. त्यानंतर हा रस्ता तसाच पडून होता. अलीकडेच शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे केले जात आहेत. यामध्ये गिट्टीखदान ते गोरेवाडा रिंग रोडपर्यंतचा रस्त्याचेही भाग्य उजळले. वर्षभरापूर्वी कामाला सुरुवात झाली. आठ महिन्यात सिमेंट रस्ता पूर्ण होणार होता, त्यामुळे या परिसरातील नागरिकही आनंदी होते. परंतु सुरुवातीपासूनच काम रेंगाळले. साडेतीन कोटी रुपयांचा हा रस्ता होता. परंतु कॉन्ट्रॅक्टरला पैसेच मिळाले नसल्याने काम अडून होते. बरेच महिने काम ठप्प पडले होते. नंतर निधीची समस्या दूर झाली, कामाला सुरुवात झाली तरी रस्त्याच्या कामाला पाहिजे तशी गती नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्ता वर फूटपाथ खाली
बोरगाव चौकात सिमेंट रोडचे काही प्रमाणात काम झाले असले तरी हा रस्ता नागरिकांना दिलासा ऐवजी त्रासदायकच अधिक ठरत आहे. कारण सिमेंट रोड बनला असला तरी फूटपाथ तसेच सोडण्यात आले आहेत. त्यावर सिमेंटचे गट्टू लावण्यात आले नाही. रस्ता वर आणि फूटपाथ खाली झाले आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्क केली जात आहे. फूटपाथ खोल झाल्याने नागरिकांना तेथून चालणेही कठीण झाले आहे. चौकातच ऑटो स्टॅँण्ड आहे. फूटपाथवर गट्टू न लगल्याने ऑटो रस्त्यावरच उभे असतात. त्यामुळे ऑटो चालकासह नागरिकांनाही त्रास होतो. याबाबतची बाब स्वत: ऑटो चालकांनी व्यक्त केली आहे. फूटपाथपर्यंत सिमेंटचे गट्टू तातडीने लावण्यात यावे, अशी मागणी छत्रपती गोतमारे, नारायण थोटे, रामेश्वर सरोदे, मनोज चऱ्हाटे आदींनी केली आहे.
बोरगाव चौक झाला धोकादायक
सिमेंट रोडमुळे बोरगाव चौक अपघाताच्या दृष्टीने अतिशय धोकादायक झाला आहे. येथून वाहन चालकच नव्हे तर पायी जाणाऱ्यांनाही आपला जीव सांभाळूनच चालावे लागते. इतका तो धोकायदाक झाला आहे. कारण सिमेंट रोडवरून बोरगाव वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याची ‘लेव्हल’ मिळविलेली नाही. सर्वत्र दगड पसरल्याने या रस्त्यावरून वाहनचालकांना जाणे कठीण झाले आहे. चौकाला लागूनच शाळा आहे. शाळकरी मुलांनाही आपला जीव धोक्यात घालून जावे लागते. तेव्हा याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा अरुण डवरे, राजू चऱ्हाटे, भीमराव फुसे, विनोद डवरे, विठोबा गिरे आदींनी केली आहे.
बससेवा कधी सुरू होणार?
सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून बोरगावपर्यंत बस येणे बंद झाले आहे. गोरेवाड्याला जाणारी बस दिनशॉ फॅक्टरीजवळच थांबविली जाते. आता बोरगावपर्यंतचा रस्ता बनला आहे. त्यामुळे बोरगाव चौक व गोरेवाड्यापर्यंत बस जाऊ शकते, तरीही बस ही दिनशॉ कंपनीजवळच थांबविली जात आहे. तेव्हा ही बस बोरगाव चौक व गोरेवाड्यापर्यंत कधी सुरू होणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
चार महिन्यात काम पूर्ण होणार
रस्त्याचे काम आठ महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. उशीर झाला हे खरे आहे. कारणही तसेच होते. सुरुवातीला निधीची समस्या असल्याने काम रखडले, परंतु ती समस्या सुटली आहे. सर्वात महत्त्वाची अडचण वाहतुकीची होती. या रस्त्यावर आऊटलेट नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम करावे लागत आहे. फूटपाथवरचे कामही लवकरच केले जाईल. आता काम सुरू झाले असून, येत्या चार महिन्यात काम पूर्ण होईल.
भूषण शिंगणे
विश्वस्त व नगरसेवक नागपूर सुधार प्रन्यास