कालव्यालगतचे अतिक्रमण हटविणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:30+5:302021-02-27T04:08:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पेंच प्रकल्पाच्या मायनरलगत रामटेक तालुक्यातील काचूरवाही व मसला येथे अतिक्रमण करण्यात आल्याने मायनर बुजल्यागत झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी या कालव्यासह मायनरची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नाेटिसा बजावल्या. या नाेटिसा पाठवून १५ दिवस झाले आहेत. मात्र, अतिक्रमण हटवण्यात आले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा मुख्य मायनर काचूरवाही व मसला गावालगत गेला आहे. या मायनरलगत दाेन्ही गावांमधील काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने मायनर बुजल्यागत झाला. त्यातून पूर्ण दाबाने पाणी पुढे जात नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. शिवाय, पाण्याचा अपव्यव वाढला असून, मायनर फुटण्याची शक्यताही बळावली आहे. ही समस्या साेडविण्यासाठी ‘लाेकमत’मध्ये १६ जानेवारी राेजी ‘पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात’ तसेच ११ फेब्रुवारी राेजी ‘रामटेक पाटबंधारे विभागाचे कारवाईचे आदेश’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते.
या वृत्ताची दखल घेेत पाटबंधारे विभागाच्या रामटेक कार्यालयातील अभियंता थाेटे यांनी या अतिक्रमणाची लगेच पाहणी केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने अतिक्रमणधारकांना २७ जानेवारी राेजी अतिक्रमण काढण्यासंदर्भात नाेटिसा बजावल्या. अतिक्रमण काढण्यासाठी या नाेटिसीमध्ये नमूद असलेला कालावधी संपला आहे. या काळात अतिक्रमणधारकांनी किंवा पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. परिणामी, हा मायनर बुजल्यागत झाला असून, त्याचा शेतकऱ्यांना त्रास हाेत आहे. कालवा व मायनरच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण पूर्णपणे काढावे, तसेच त्याची साफसफाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
...
गुन्हे दाखल करण्याची सूचना
मायनरलगतचे अतिक्रमण सात दिवसात काढून मायनर माेकळा करण्यात यावा. अतिक्रमण न काढल्यास, अवैध बांधकाम करून शासकीय जमीन व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९६७ अन्वये अतिक्रमणधारकांवर फाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख त्या नाेटिसीमध्ये करण्यात आला आहे. वास्तवात, याला १५ दिवस पूर्ण झाले असून, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढले नाही. शिवाय, कुणावरही फाैजदारी गुन्हे दाखल केले नाहीत.