गुरांचे लसीकरण करणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:54+5:302021-06-29T04:07:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तालुक्यातील काही जनावरांना ताेंड व पायखुरीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात साथीचे आजार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील काही जनावरांना ताेंड व पायखुरीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असल्याने त्यात जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्या आजारापासून गुरांचा बचाव करण्यासाठी त्यांचे लसीकरण करणे अनिवार्य असताना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने अद्यापही लसीकरणाला सुरुवात केली नाही. त्यामुळे गुरांचे लसीकरण करणार कधी, असा प्रश्न कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे गुरांना संसर्गजन्य व साथीच्या आजारांची लागण हाेते. त्यामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीला गुरांच्या लसीकरणाची माेहीम हाती घेतली जाते. अनेक शेतीला जाेडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करीत आल्याने त्यांच्यासाठी जनावरे अत्यंत महत्त्वाची असतात. जनावरांचे वर्षभरात तीनदा लसीकरण करणे आवश्यक असते. मात्र, राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत असून, वेळ गेल्यावर लसीकरण केले जात असल्याचा आराेप माजी आमदार देवराव रडके यांनी केला आहे.
जैवतंत्रज्ञानामुळे विविध आजारांवर परिणामकारक लस निर्मिती होत असल्याने गुरांना या गंभीर राेगांपासून सहज वाचविता येते. या लसींमुळे तोंडखुरी, पायखुरी, एकटांग्या, पीपीआर, गर्भपात नियंत्रण, घटसर्प, फऱ्या रोगांवर नियंत्रण मिळविता येते. यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही पशुचिकित्सकांनी सांगितले. फाशी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वात, स्तनदाह, हळवा, आंत्रिविषार हे आजार गंभीर व जीवघेणे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, लसीकरणाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे.
...
गुरांना जडणारे आजार
पावसाळ्यात जनावरांना सहसा तोंडखुरी, पायखुरी, एकटांग्या, घटसर्प या आजाराची लागण हाेते. यातील ताेंडखुरी व घटसर्प या आजारामुळे जनावरांचा मृत्यू हाेण्याची दाट शक्यता असते. रक्षाट्रायोवेक नामक एकच लस तीन आजारांवर काम करीत असल्याची माहिती पशुचिकित्सकांनी दिली. या लसीमुळे गुरांचे वर्षभरात तीनदा लसीकरण करण्याची गरज नसते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्य शासनाने रक्षाट्रायोवेक ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार देवराव रडके यांनी केली आहे.