‘बीएड’ची सीईटी कधी होणार ?
By admin | Published: June 18, 2015 02:23 AM2015-06-18T02:23:21+5:302015-06-18T02:23:21+5:30
राज्यात सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असताना, बीएड व एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तारीख अद्यापही
आशिष दुबे ल्ल नागपूर
राज्यात सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असताना, बीएड व एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. उच्च शिक्षण संचालनालयाकडूनही प्रवेश परीक्षा (सीईटी) संदर्भात कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. तर या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची चिंता वाढली आहे.
नागपूर विभागात बीएडचे ८१ महाविद्यालय आहे. यात ८५०० वर जागा आहे. मात्र, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३५०० आहे. गेल्या वर्षी अनेक महाविद्यालयातील जागा रिक्त होत्या. एमएड अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची अवस्थाही सारखीच आहे. यावर्षी सरकारने दोन्ही अभ्यासक्रमाची अवधी दोन वर्ष केली आहे. अशात प्रवेश परीक्षेची तारीख लवकरात लवकर निश्चित न झाल्यास मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविद्यालयातील व्यवस्थापनाच्या मते दोन्ही अभ्यासक्रमाची अवस्था वाईट आहे. गेल्यावर्षी बी.एड. अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रक्रिया २२ मे ला सुरू झाली होती. १४ जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. ३० जूनला निकालही घोषित झाले होते. ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. यावर्षी सीईटीचा पत्ताच नाही.
अद्याप काहीच माहिती नाही
अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होईल की नाही, यासंदर्भात उच्च शिक्षा संचालनालयाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे कुठलीही माहिती नाही. सहसंचालक डॉ. अंजली राहटगांवकर यांनी प्रवेश परीक्षेसंदर्भात कुठलेही निर्देश अद्यापपर्यंत आले नसल्याचे स्पष्ट केले.
निविदाच तयार झाली नाही
बीएड आणि एमएडच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या जबाबदारीसाठी उच्च शिक्षा संचालक डॉ. धनराज माने यांनी निविदा जारी केली. निविदा २५ मे पर्यंत होणे गरजेचे होते. परंतु अद्यापही त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.