अजनीतील छोटा रामझूलाचे काम कधी होणार? १५ वर्षांपासूनची मागणी
By नरेश डोंगरे | Published: February 27, 2024 10:11 PM2024-02-27T22:11:08+5:302024-02-27T22:11:23+5:30
कंत्राट दिले मात्र प्रत्यक्ष कामाला गती नाही
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सोमवारी हजारो कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या देशातील ठिकठिकाणच्या आरयूबी, आरओबीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रदीर्घ कालावधीपासून उपेक्षित असलेल्या अजनी आरओबीचे निर्माण कार्य अजूनही रेंगाळलेल्या अवस्थेतच आहे. हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रस्ताव मंजुरीनंतर एक वर्षाचा कालावधी होत आला तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला गती आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या कामाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीचे काही अधिकारी सुटीवर गेले आहे. या संबंधाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी 'हे काम महाराष्ट्र रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमआरआयडीसी) बघत असल्याचे सांगितले. सूत्रांच्या मते एमआरआयडीसी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या दरम्यान या कामाच्या ड्राईंग आणि डिझाईन संबंधाने समन्वय होत नसल्याने हे काम प्रभावित झाले आहे.
अजनीत आरयूबी होण्याची मागणी सुमारे १५ वर्षांपासून केली जात आहे. मात्र, जर्जर झालेल्या पुलाला खालून टेका देऊनच काम भागविले जात आहे. रेल्वेशी संबंधित महत्वाच्या कामात विलंब होण्याची बाब नवीन राहिली नाही. आधी जयस्तंभ चाैक ते मेयो हॉस्पिटलपर्यंत रामझूला अर्थात केबल स्टेयड ब्रीजचे कामही कासव गतीने करण्यात आले आता तसाच प्रकार अजनीच्या छोटा रामझुलाच्या कामासंबंधाने सुरू आहे. या संबंधाने एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.