कंत्राटी शिक्षकांची पदभरती होणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:54+5:302020-12-24T04:08:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांच्या नियुक्तीला ‘कोरोना’सह प्रशासकीय संथपणाचादेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांच्या नियुक्तीला ‘कोरोना’सह प्रशासकीय संथपणाचादेखील फटका बसतो आहे. पदव्युत्तर विभागांतील प्रवेशप्रक्रिया सुरू असून लवकरच शैक्षणिक वर्ग सुरू होणार आहेत. विभागांतील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले असून विभागांना शिक्षकांची कमतरता निश्चितच भासणार आहे. अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया का सुरू झालेली नाही असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसह विभागांकडूनदेखील विचारण्यात येत आहे
विद्यापीठाच्या जवळपास सर्वच पदव्युत्तर विभागांमध्ये पूर्णकालीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठान दोन वर्षांअगोदर कंत्राटी पदे भरण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी विद्यापीठाने विविध विभागांत १०४ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली होती. यंदा कंत्राटी शिक्षक भरतीचे हे तिसरे वर्ष असणार आहे. ‘कोरोना’मुळे यंदा ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात आले व तृतीय सत्राचा अभ्यासक्रम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू असून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात वर्गांना सुरुवात होईल. ‘ऑनलाईन’ वर्ग जरी सुरू झाले तरी शिक्षकांची कमतरता भासणार आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षक कधी भरणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना फटका बसण्याची चिन्हे
कंत्राटी पदभरतीसंदर्भातील प्रस्ताव अधिष्ठाता मंडळाकडून व्यवस्थापन परिषदेकडे जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविणे, मुलाखती यासाठी महिनाभराचा कालावधी जाईल. त्यामुळे वर्ग सुरू झाल्यानंतरदेखील कंत्राटी शिक्षकांसाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत.
यंदा कमी लोकांची भरती
‘कोरोना’मुळे पदव्युत्तर विभागांमध्ये ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यातही प्रात्यक्षिकांबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे यंदा कमी लोकांची भरती होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता प्रक्रिया सुरू असून लवकरच जाहिरात काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.