पूर नियंत्रणासाठी नाला सफाई करणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:08+5:302021-06-09T04:11:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नागरीकरण व कचरा साचल्याने नाले अवरुद्ध झाले आहेत. पुराचा संभाव्य धाेका टाळण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे गरजेचे आहे. यावर्षी राेहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यातच यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही नाले साफ केले नाहीत. प्रशासनाची ही अनास्था पुराचा धाेका वाढविणारी असल्याने ही कामे नेमकी करणार कधी, असा प्रश्न नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
काेराेना संक्रमणामुळे प्रशासकीय यंत्रणा काेराेना नियंत्रण कार्यात गुंतली आहे. मात्र, संभाव्य धाेका टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणेही तितकेच गरजेचे आहे. रामटेक तालुक्यात दरवर्षी सरासरी ११०० मिमी पावसाची नाेंद हाेते. त्यातच गवळण नाल्याला येणारा पूर दरवर्षी डाेकेदुखी ठरताे. या नाल्याच्या पुरामुळे काठावरील शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरुकुलनगर, आनंदनगर, दमयंतीनगर व इतर नागरी वस्त्या जलमय हाेतात. त्यामुळे हा धाेका टाळण्यासाठी या नाल्याची व्यवस्थित साफसफाई करणे गरजेचे आहे.
या नाल्याकाठच्या मुरमुरा भट्टीजवळील वळणावर नाल्यात माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडसर निर्माण हाेत असल्याने पुराचा धाेका वाढताे. त्यासाठी ही झुडपे ताेडून पात्र साफ करणे आवश्यक आहे. या नाल्याचे खाेलीकरण व रप्ट्याची समस्या सर्व लाेकप्रतिनिधींना माहिती आहे. ही समस्या साेडवण्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची ग्रामपंचायत प्रशासनाची ऐपत नसल्याने स्थानिक नेत्यांच्या स्थानिक विकास निधीतून पैसा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
...
सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
गवळण नाल्याला पूर आल्यानंतर त्या काठच्या नागरी वस्त्यांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घर, विहिरी व रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात या नाल्याचा चिखल व कचरा साचताे. या नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्याने नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागताे. वारंवार मागणी करूनही उंच पूल बांधण्यात आला नाही. या नाल्याला बांधलेली सुरक्षा भिंतही निरुपयाेगी ठरली आहे. रहदारीचा रप्टाही पाण्याखाली येत असल्याने नवी समस्या निर्माण हाेते.