ग्रामीण भागाच्या अंधार यातना कधी संपणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:41+5:302021-09-02T04:18:41+5:30

शरद मिरे/ लोकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : महानगरातील वाढती लोकसंख्या, यातच प्रदूषणाची समस्या लक्षात घेता मध्यंतरी खेड्याकडे चला असा ...

When will the dark torment of rural areas end? | ग्रामीण भागाच्या अंधार यातना कधी संपणार?

ग्रामीण भागाच्या अंधार यातना कधी संपणार?

Next

शरद मिरे/ लोकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : महानगरातील वाढती लोकसंख्या, यातच प्रदूषणाची समस्या लक्षात घेता मध्यंतरी खेड्याकडे चला असा सूर निनादला. मात्र, याच खेडेगावांची अवस्था आता दयनीय आहे. गावांना प्रकाशमय करणाऱ्या पथदिव्यांचे देयके भरण्याकरिता ग्रामपंचायतींकडे पैसे नाहीत. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे ८८वर गावे सध्या अंधारयातना भोगत आहेत.

भिवापूर तालुक्यात ५६ ग्रामपंचायती असून, १३७ गावांचा समावेश आहे. महावितरण कंपनीअंतर्गत तालुक्यातील पथदिव्यांची ग्राहक संख्या १३५ आहे. गत काही वर्षांपासून पथदिव्यांच्या विद्युत देयकांचा भरणा केला नसल्यामुळे ग्रामपंचायतींवर थकीत देयकांचे डोंगर वाढले आहे. एकट्या नांद ग्रामपंचायतीकडे १३ लाख रुपयांचे देयके थकीत आहे. पथदिव्यांच्या थकीत देयकांसोबतच चालू विद्युत देयकांचा सुद्धा भरणा होत नसल्यामुळे महावितरण कंपनीने अशा ग्राहक असलेल्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यानुसार ८८ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १ कोटी ९३ लाख ५५ हजार ३७२ रुपये थकीत आहे, तर पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरू असलेल्या ४७ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख २ हजार ९२१ रुपये थकीत आहेत. अशा प्रकारे पथदिव्यांच्या थकीत देयकांचा आकडा ३ कोटींच्या घरात आहे. विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे किमान चालू देयके भरल्यास पुरवठा पूर्ववत सुरू करणार असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कुठून भरणार देयके?

घरटॅक्स, पाणी कर व इतर किरकोळ बाबी वगळता ग्रामपंचायतींकडे उत्पन्नाचे भरीव माध्यम नाही. त्यामुळे थकीत तर सोडाच, चालू देयकांचा भरणासुद्धा कुठून करायचा, असा प्रश्न ग्रामपंचायतींना पडला आहे. खेडेगावांना सुजलाम्, सुफलाम् व समृद्ध करण्याचा मानस राज्य शासन व्यक्त करीत असले तरी हीच गावे आता अंधारयातना सोसत आहेत. त्यामुळे गृहजिल्हा असलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत व आ. राजू पारवे यांनी अंधारात बुडालेल्या गावांतील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. इकडे माजी आ. सुधीर पारवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत ग्रामीण भागातील या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

चालू देयकांची रक्कम २४ लाख

तालुक्यातील पथदिव्यांच्या थकीत देयकांची रक्कम तीन कोटींच्या घरात असली तरी एप्रिल ते ऑगस्ट या कालखंडातील चालू देयकांची रक्कम केवळ २४ लाख रुपये आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेल्या सर्व ग्रामपंचायतींनी आपआपली चालू देयकांची एकूण रक्कम २४ लाख रुपये भरली तरी पथदिव्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.

------

थकीत देयकापोटी पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. ज्या ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांची चालू देयकेसुद्धा थकीत आहेत, अशाच ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यातील चालू देयकांचा भरणा संबंधितांनी केल्यास त्यांचा विद्यूत पुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू करण्यात येईल.

- दामोधर उरकुडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.

Web Title: When will the dark torment of rural areas end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.