विकासाची गाडी कधी येईल ट्रॅकवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:07 AM2017-10-24T00:07:21+5:302017-10-24T00:08:26+5:30
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. दररोज नागपूर रेल्वेस्थानकावरून चारही दिशांना जाणाºया १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे मंत्रालयाने मागील दहा वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा नागपूरसाठी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. दररोज नागपूर रेल्वेस्थानकावरून चारही दिशांना जाणाºया १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे मंत्रालयाने मागील दहा वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा नागपूरसाठी केली. परंतु प्रत्यक्षात यातील एकही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. अनेक योजना अनेक वर्षांपासून केवळ कागदापुरत्यात उरल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भाचा विकास रखडला असून रखडलेले प्रकल्प मार्गी लावल्यास विदर्भाचा कायापालट होणार आहे. परंतु त्यासाठी घोषणा केलेले प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लासचा दर्जा देण्यात आला. वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाच्या दृष्टीने नागपूर रेल्वेस्थानक वाटचाल करीत असताना रेल्वे बोर्डाने निधीचा तुटवडा असल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव ‘होल्ड’वर ठेवण्यात आला. नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशनच्या रूपाने विकास झाल्यास येथे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होऊन नागपूर रेल्वेस्थानक जगातील आदर्श रेल्वेस्थानकांच्या यादीत जाऊन बसणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे रेटण्याची गरज आहे.
कळमनात वेअरहाऊसची निर्मिती
कळमना रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेची बरीच एकर जागा रिकामी आहे. यात १५ एकर जमिनीवर वातानुकूलित वेअरहाऊसची निर्मिती करता येऊ शकते. नागपूरच्या आजूबाजूला असलेल्या भागातील गावासाठी नागपूर हे व्यापाराचे केंद्र आहे. आजूबाजूच्या गावातून अनेक लहान-मोठे व्यापारी मालाच्या खरेदी-विक्रीसाठी येथे येतात. अशापरिस्थितीत त्यांचा माल ठेवण्यासाठी गोदाम आणि मालाच्या सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने ५० हजार टन क्षमतेच्या आधुनिक गोदामाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. परंतु त्याला आजपर्यंत मंजुरी मिळू शकली नाही.
मोतीबाग कारखान्याचे आधुनिकीकरण महत्त्वाचे
मोतीबागचा रेल्वेचा कारखाना १३५ वर्षे जुना आहे. परंतु हा कारखाना इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. हा कारखाना ६७ हजार ५८० चौरस फुटांच्या जागेत विस्तारला आहे. येथे नॅरोगेज आणि ब्रॉडगेजच्या कोचची देखभाल करण्यात येते. येथे रेल्वेगाडीच्या चाकांचीही दुरुस्ती करण्यात येते. याशिवाय येथे ग्रीन टॉयलेटचा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. कारखान्यात एकूण एक हजार कर्मचारी काम करतात. अनेक कर्मचाºयांची पदे येथे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. २००७ मध्ये मोतीबाग कारखान्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु या निधीचे काय झाले, कुणालाच माहीत नाही.
नागपुरातून हव्यात थेट रेल्वेगाड्या
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. परंतु तरीसुद्धा येथून महानगरांना जोडणाºया थेट रेल्वेगाड्या सोडण्यात येत नाहीत. मुंबई वगळता कुठल्याच महानगरात येथून रेल्वेगाड्या नाहीत. नागपुरात कार्गो हब, मिहान यासारख्या प्रकल्पांकडे पाहता नागपूरातून बेंगळुरु, दिल्ली, मद्रास, कोलकाता या महानगरांसाठी तसेच तीर्थस्थळांना जोडणाºया रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. परंतु आजपर्यंत महानगरांना जोडणारी एकही थेट रेल्वेगाडी सुरू करण्यात आली नसल्यामुळे वैदर्भीयांची निराशाच झाली आहे.
नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईन गरजेची
सध्या नागपूर-वर्धा मार्गाची क्षमता १०० रेल्वेगाड्या धावण्याची आहे. परंतु या मार्गावर १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यामुळे रुळाच्या देखभालीसाठी वेळ मिळत नसून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करीत आहे. एखाद्या प्रसंगी यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे अर्थसंकल्पात थर्ड आणि फोर्थ लाईनची घोषणा करण्यात आली. परंतु थर्ड लाईनचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांची दाट शक्यता आहे. थर्ड लाईन पूर्ण झाल्यास विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळून नागपूरचा विकास होणार आहे. त्यामुळे थर्ड लाईनच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
नीर बॉटलिंग प्लान्टची आवश्यकता
सहा वर्षांपूर्वी नागपूरात नीर बॉटलिंग प्लान्टची घोषणा करण्यात आली होती. यासाठी दौºयावर आलेल्या रेल्वे अधिकाºयांच्या चमूने बुटीबोरी परिसरात या प्लान्टसाठी जागेची पाहणीही केली होती. परंतु या प्लान्टलाही थंडबस्त्यात टाकण्यात आले. नीर बॉटलिंग प्लान्ट नागपुरात सुरू झाल्यास विदर्भातील बेरोजगारांना तेथे रोजगार उपलब्ध होईल. याशिवाय रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा प्लान्ट त्वरित सुरू करण्याची गरज आहे.
इतवारी, अजनी, गोधनीला करावे टर्मिनल
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १६० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यामुळे रेल्वेस्थानकावर मोठा ताण येतो. यात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची आणखीनच गैरसोय होते. अशापरिस्थितीत इतवारी, अजनी, गोधनी यासारख्या छोट्या रेल्वेस्थानकांचा विकास करून तेथे टर्मिनल सबस्टेशन तयार करण्याची गरज आहे. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होऊन संबंधित भागाच्या विकासाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
रखडलेल्या प्रकल्पांचे पुनर्सर्वेक्षण व्हावे
‘अनेक प्रकल्प घोषित केल्यानंतर वर्षानुवर्षे त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी प्रकल्पांची किंमत वाढते. त्यामुळे अशा रखडलेल्या प्रकल्पांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यातील महत्त्वाचे प्रकल्प अधोरेखित करून ते पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील.’
-प्रवीण डबली, माजी सदस्य,
क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती,
दपूम रेल्वे, नागपूर