ऐतिहासिक रामटेक गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:15+5:302021-07-15T04:07:15+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ...

When will the eclipse of the historical Ramtek fort end? | ऐतिहासिक रामटेक गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल?

ऐतिहासिक रामटेक गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल?

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ११ वर्षांत विकास व संवर्धनासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतरही रामटेक येथील ऐतिहासिक गडमंदिराची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार, रामटेक नगर परिषद व पुरातत्व विभागावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गडमंदिराच्या दुरावस्थेचे ग्रहण कधी सुटेल हा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे.

यासंदर्भात न्यायालयात २०१० पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणातील न्यायालय मित्र वरिष्ठ वकील ॲड. आनंद जयस्वाल यांनी ४ जुलै २०२१ रोजी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसाेबत मिळून गडमंदिर व परिसराचे निरीक्षण केले. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाणे, रामटेकचे उप-विभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे, रामटेक नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनीलकुमार दमाहे व सहायक सरकारी वकील ॲड. दीपक ठाकरे यांचा समावेश होता. त्यानंतर ॲड. जयस्वाल यांनी १२ जुलै रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून गडमंदिराच्या दुरावस्थेची माहिती दिली.

--------------

अशी आहे दुरावस्था

१ - गडमंदिर परिसरात वराह, शिरपूर, भैरव व गोकुल अशी चार प्रवेशद्वारे असून त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने १२ जुलै २०१९ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून चारही प्रवेशद्वारांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, अद्याप कामाला सुरुवात करण्यात आली नाही.

२ - गोकुल प्रवेशद्वाराचा प्रशासकीय कार्यालय व बुकस्टॉलकरिता उपयोग केला जात आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराचे पौराणिक सौंदर्य हरवले आहे. पर्यटकांना प्राचिनतेचा अनुभव घेता येत नाही.

३ - मंदिर परिसरात अनेक अनधिकृत पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. ही बांधकामे पाडण्याची आणि येथील अगस्त्य मुनी आश्रमाची वैधता तपासण्याची आवश्यक आहे. आश्रमाचा ताबा खासगी व्यक्तींकडे आहे.

४ - स्वच्छता व भाविकांच्या सुविधेसाठी गडमंदिरापर्यंत पुरेसा पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाण्याची समस्या अद्याप सोडवण्यात आली नाही. यासाठी सरकारकडे निधीची मागणी केल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.

५ - नियमित देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्यामुळे गडमंदिराची सर्वाधिक हानी झाली आहे. सध्या दगडांच्या बांधकामात वनस्पती व शेवाळ वाढले आहे. मंदिरातील कुंडेही खराब झाली आहेत.

६ - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर परिसरातील दुकानांचे अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यानंतर दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यांना दुसऱ्यांदा हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही.

७ - गडमंदिर परिसरात रुद्र नरसिम्हा मंदिर, केवल मंदिर, वराह मंदिर व त्रिविक्रम मंदिर ही वाकाटककालीन मंदिरे असून ती गडमंदिरापेक्षाही प्राचीन आहेत. ही मंदिरे सम्राट चंद्रगुप्त यांची कन्या प्रभावती गुप्त यांनी बांधली आहेत. ही मंदिरेदेखील दुर्लक्षित आहेत. या मंदिरांच्या इतिहासाची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याविषयी काहीच माहिती नाही.

---------------

सरकारला उत्तर सादर करण्यासाठी वेळ

या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने ॲड. जयस्वाल यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन राज्य सरकारला यावर उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला. सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे तर, नगर परिषदेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

Web Title: When will the eclipse of the historical Ramtek fort end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.