कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:10 AM2021-09-07T04:10:29+5:302021-09-07T04:10:29+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले ...

When will the exile of Kalidasa monument end? | कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

कालिदास स्मारकाचा वनवास संपणार कधी?

Next

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेच्या दुर्लक्षित व उदासीन धाेरणामुळे गडमंदिर परिसरात असलेले कालिदास स्मारक बकाल झाले आहे. या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्ती व सुधारणांसाठी शासनाच्या वतीने निधी दिला जात असला तरी त्याचा याेग्य विनियाेग व फायदा हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे या स्मारकाचा वनवास संपविण्यासाठी त्याचे पालकत्व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाकडे द्यावे, तसेच पालिका प्रशासनाने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण याेजना निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याचा पालिकेच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे. निधीची टंचाई, आजवर करण्यात आलेली कामे, त्यांचा दर्जा व त्यानंतर झालेली स्मारकाची ‘जैसे थे’ अवस्था बघता स्मारकाचा हा वनवास कधी संपणार हे सांगणेही कठीण आहे. विद्यापीठ या स्मारकाचे पालकत्व स्वीकारायला व त्याची काळजी घ्यायला सर्वताेपरी तयार आहे; पण विद्यापीठाला यात पालिकेचा काेणताही हस्तक्षेप नकाे आहे.

नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी साधे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कारंजे दुरुस्त करून विजेचे साधे व आकर्षक दिवे लावणे, त्यावरील विजेच्या बिलाचा खर्च करणे, परिसराचे साैंदर्यीकरण करणे, केलेली कामे अधिकाधिक काळ टिकून राहणे यासह अन्य बाबी पालिका प्रशासनाला आजवर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात ही कामे पालिकेला जमेल आणि त्या कामांचा दर्जा उत्तम असेल, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

शहरात स्मारक हस्तांतरणाच्या अटींवरून राजकीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून येतात. मात्र, सामान्य जनतेच्या मते पालिकेने त्यांच्या अटी मागे घेऊन कालिदास स्मारक विनाअट विद्यापीठाकडे हस्तांतरित करावे. याबाबत बहुतांश नागरिक पालिकेने आजवर केलेल्या कामाचा व स्मारकाच्या ‘जैसे थे’ अवस्थेचा दाखला देतात.

...

पालिकेच्या अटी विद्यापीठाला अमान्य

स्मारक हस्तांतरणात रामटेक नगरपालिका प्रशासनाने येथील संगीत कारंजे सुरू करावेत, परिसराचे साैंदर्यीकरण पूर्ण झाल्यावर जनतेसाठी जर प्रवेश तिकीट लावत असेल तर त्यात पालिकेला सहभागी करावे, स्मारक प्रवेशद्वारावर पालिकेच्या नावाचा उल्लेख असावा, या तीन अटी घातल्या आहेत. या अटी साध्या वाटत असल्या तरी पालिकेला नावाच्या रूपाने काही न करता त्यांचे वर्चस्व व अस्तित्व स्मारकात कायम ठेवायचे आहे. विद्यापीठाला या अटी मान्य नसल्याने त्यांनी हस्तांतरण प्रस्ताव परत पाठविला आहे.

...

विराेध, समर्थनाचेही राजकारण

निधीअभावी साैंदर्यीकरणासह अन्य कामे रखडली आहेत. यासाठी पालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घाेषणा केली आहे. हा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने त्यांच्या अटी मागे घ्याव्यात, असे मत माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर भाेयर यांनी व्यक्त केले असून, याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. पालिकेने घातलेल्या अटी साध्या व जनतेच्या हिताच्या आहेत. विद्यापीठाने त्या मान्य करायला हव्यात. पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजना वित्त आयाेग निधीतून देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविता येताे, असे मत भाजपचे संजय मुलमुले यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, पालिकेला हा निधी यापूर्वीही मिळायचा. मात्र, स्मारकाच्या अवस्थेत फारसा बदल झाला नाही.

...

नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण याेजनेंतर्गत चार काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील ५० लाख रुपये कालिदास स्मारकाच्या दुरुस्ती व साैंदर्यीकरणावर खर्च करण्याचा निर्णय पालिकेने सर्वानुमते घेतला आहे.

- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष,

नगरपालिका, रामटेक

Web Title: When will the exile of Kalidasa monument end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.