अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:56+5:302021-05-21T04:08:56+5:30
राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे ...
राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : सन २०१९ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नांद (ता. भिवापूर) परिसरातील बहुतांश पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आणि पीककर्ज खात्यात जमा करून तेवढे कर्जाची तेवढी रक्कम कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. नांद परिसरातील ३६५ लाभार्थ्यांपैकी केवळ १६ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी ती अद्यापही मिळाली नाही. दुसरीकडे, परतीचा पाऊस व किडींमुळे साेयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती जेमतेम आहे तर या बियाण्यांचे दर कमालीचे वाढले असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा विपरित परिस्थितीत खरीप नियाेजन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
शेतकऱ्यांनी घरातील बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्याची उगवणशक्ती तपासून बघावी, असे कृषी विभागाच्यावतीने वारंवार आवाहन केले जात आहे. वास्तवात, मागील हंगामात किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील साेयाबीन खराब झाले. कापणीच्यावेळी पीक पावसात भिजल्याने काळवंडलेल्या व बुरशी लागलेल्या त्या साेयाबीनच्या दाण्यांची उगवणशक्ती किती असेल, याची जाणीव मात्र कुणालाही नाही. राज्यभर साेयाबीन बियाण्यांच्या तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति बॅग (३० किलाे) ३,४०० ते ३,५०० रुपये माेजावे लागणार आहे. बाजारात साेयाबीनचे (बियाणे नाही) दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांवर पाेहाेचले आहे.
पेरणीसाठी पैसा हवा म्हणून शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करीत नव्याने पीककर्ज घेणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून चालू पीककर्जावर ७ टक्के व्याजदर आकाराला जात आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा हाेईल व थाेडा दिलासा मिळेल, या आशेवरही पाणी फेरले आहे. कारण, नांद परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ३६५ व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १६ कर्जदार खातेदारांना याचा लाभ मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांना हा लाभ मिळाला असून, उर्वरित ३६५ लाभार्थी आजही प्रतीक्षेत आहे.
...
अवकाळी पाऊस घातक
शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, वखरणी केली असून, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी जमीन चांगली तापणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार अवकाळी पावसाच्या सरी बरसत असल्याने जमीन पुरेसी तापत नसल्याने जमिनीतील घातक बुरशी व जिवाणू नष्ट हाेत नाही. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पिके या बुरशी व जिवाणूंमुळे मूळकुज व तत्सम राेगांना बळी पडणार असल्याची व त्यातून पिकांचे माेठे नुकसान हाेणार असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस सध्या शेतीसाठी घातक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
...
उत्पादन खर्च वाढणार
नांद व परिसरात बुधवारी (दि. १९) सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तास बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला व नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. लाॅकडाऊनमुळे मजूर घरीच आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामेही हातावेगळी केली आहेत. पीककर्जाची रक्कम अद्याप हाती न आल्याने बियाणे व रासायनिक खतांची जुळवाजुळव करायची कशी, ही चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच बियाणे व खतांच्या किमती वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
===Photopath===
190521\5606videoshot_20210519_122955.jpg
===Caption===
पाऊसाने झोडपले