नागपुरात पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:27 PM2019-04-25T23:27:47+5:302019-04-25T23:28:59+5:30
पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
शाळेला सुट्या लागल्या आहेत. अनेक लहान मुले, तरुणांची जलतरण तलावांवर गर्दी होत आहे. यामुळे बहुसंख्य जलतरण तलावाच्या बॅचेस फुल्ल आहेत. एकट्या मेडिकलच्या जलतरण तलावावर सकाळ व रात्रीच्या मिळून १० बॅचेस चालतात. एका बॅचमध्ये ५० ते ६० विद्यार्थी आहेत. अशी स्थिती सर्वच तलावांवरची आहे. परंतु सुरक्षेबाबत हवे तेवढे गांभीर्य पाळत नसल्याचे या क्षेत्रातील खुद्द प्रशिक्षकांचे मत आहे. त्यांच्यानुसार, पोहणे शिकणाऱ्याची सुरक्षा हे पहिले प्राधान्य असले पाहिजे. यासाठी दक्ष ‘लाईफ गार्ड’ व योग्य प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु यावर कुणाचे नियंत्रण नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.
शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक
तज्ज्ञाच्या मते, पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्यांपासून ते पोहण्यासाठी येणाºयांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले जाते. कोणतीही खातरजमा न करता अनेक जण पोहत आहेत. याचे गंभीर परिणाम नंतर भोगावा लागतात. संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही यातून फैलण्याची भीती असते.
नखे वाढलेले, जखमीही नको
जलतरण तलावावर नखांची वाढ असलेल्या व्यक्तीला पोहण्यास नियमानुसार बंदी असते. जखमी व्यक्ती अथवा फिट आदी व्याधी असलेल्या कुणालाही जलतरण तलावावर पोहण्यास बंदी आहे. परंतु, शारीरिक व्याधीग्रस्त व्यक्तींच्या तंदुरुस्तीबाबतची कोणतीही तपासणी केली जात नाही.
पोहणे शिकणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे
पोहणे शिकणाऱ्यांनी सर्वात प्रथम योग्य जलतरण तलाव व प्रशिक्षकांची माहिती घेऊनच क्लासेस लावावे. प्रशिक्षकांनी सांगितल्यानंतरच कंबरेला ‘फ्लोट’ बांधूनच पाण्यात उतरावे. ‘फ्लोट’ची गाठ योग्यरीत्या बांधल्याची खातरजमा करावी. पाण्यात क्लोरिनचे प्रमाण अधिक असल्यास डोळ्यात जळजळ होऊन त्रास होण्याची शक्यता असते. त्यासाठी गॉगल्सचा वापर करावा. प्रशिक्षकांनी सांगितल्याखेरीज पाण्यात उडी मारू नये. लहान मुले पोहत असतील तर पालकांनीही याकडे लक्ष द्यायला हवे.