नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 09:01 PM2018-03-05T21:01:41+5:302018-03-05T21:01:59+5:30
उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य व केंद्र पातळीवर ‘बेटी बचावो’ मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीदेखील नियमितपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र तरीदेखील राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरात किती मुला-मुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०११ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ३ लाख ९४ हजार ६४२ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या २ लाख ३ हजार ८२६ इतकी होती. तर मुलींचा आकडा १ लाख ९० हजार ८१६ एवढा होता. सरासरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९३.६१ टक्के एवढे होते.
दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत ९४.८३ टक्के मुलींचा जन्म झाला. इतर सर्व वर्ष टक्केवारी ही ९३ व ९४ टक्क्यांच्या मध्येच होती. २०१७ मध्ये मुलांच्या प्रमाणात ९३.३९ टक्के मुलींचा जन्म झाला.
सव्वा लाखांहून अधिक मृत्यू
२०११ पासून सात वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ७६ हजार ७५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात १ लाख ६ हजार २४६ पुरुष व ७० हजार ५०९ महिलांचा समावेश होता. २०१७ मध्ये सर्वाधिक २७ हजार ११२ मृत्यूंची नोंद करण्यात आली.
सहा हजारांहून अधिक उपजत मृत्यूंची नोंद
दरम्यान, २०११ ते २०१७ या कालावधीत शहरात एकूण ६ हजार ४१५ उपजत मृत्यूची प्रकरणे आढळून आली. २०१३ मध्ये १ हजार ९०० उपजत मृत्यूंची नोंद झाली. २०१४ मध्ये १,७३५ तर २०१५ मध्ये १,६११ मृत्यू नोंदविण्यात आले. २०१६ पासून ही आकडेवारी घटली असून २०१६ मध्ये ३२६ तर २०१७ मध्ये १७७ उपजत मृत्यू झाले.