उपराजधानीतील ‘हाथरस’ कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:36 AM2020-10-03T11:36:28+5:302020-10-03T11:38:28+5:30
Nagpur News, Rape ‘पोक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात दहावा क्रमांक आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणानंतर देशभरातील समाजमन पेटून उठले आहे. महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा २१ टक्क्यांनी वाढला आहे. ‘पोक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात दहावा क्रमांक आहे. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०१९ साली नागपुरात ‘पोक्सो’ अंतर्गत एकूण २३१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची संख्या १११ इतकी होती. तर ११७ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आले. २०१८ मध्ये अत्याचाराचा आकडा ९१ इतका होता. तर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्ह्यांची संख्या १९५ इतकी होती.
महिलांविरोधातील गुन्हे कधी घटणार?
मागील तीन वर्षांत नागपुरात महिलांविरोधात झालेल्या विविध गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. २०१९ मध्ये १ हजार १४४ प्रकरणे दाखल करण्यात आली व १ हजार १५५ महिलांना विविधप्रकारे अन्यायाचा सामना करावा लागला. यात लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचे २२२ गुन्हे, अपहरणाच्या ४०५ तर पती किंवा सासरच्यांकडून क्रूरतापूर्ण वागणुकीच्या १३६ गुन्ह्यांचा समावेश होता.