पीकविम्याचा परतावा मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:50+5:302021-03-23T04:09:50+5:30
चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : खात (ता. माैदा) येथील इस्तारू गिरेपुंजे यांनी बँकेकडून पीककर्ज घेतेवेळी त्यांच्याकडून पीक ...
चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : खात (ता. माैदा) येथील इस्तारू गिरेपुंजे यांनी बँकेकडून पीककर्ज घेतेवेळी त्यांच्याकडून पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. मात्र, त्यांना पीकविम्याची काेणतीही कागदपत्रे देण्यात आली नाही. त्यातच तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे धानाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. त्यामुळे त्यांनी पीकविम्याचा लाभ मिळावा म्हणून विमा कंपनीसाेबतच तालुका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. याला पाच महिन्यांचा काळा पूर्ण हाेऊनही त्यांना विम्याच्या परताव्यापाेटी एक रुपयाचा देखील मिळाला नाही, असा आराेप इस्तारू गिरेपुंजे यांनी केला आहे.
इस्तारू गिरेपुंजे यांनी व त्यांची पत्नी गंगाबई यांच्या नावे असलेल्या एकूण सहा एकरात धानाची राेवणी केली हाेती. या सहा एकरात किमान १५० ते १६० पाेती धानाचे उत्पादन अर्थात किमतीने २ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाेण्याची त्यांना आशा हाेती. पिकाच्या मशागतीसाठी त्यांनी व त्यांच्या पत्नीने बँक ऑफ इंडियाच्या खात शाखेकडून पीककर्जाची उचल केली हाेती. पीककर्ज घेतेवेळी या दाेघांच्याही कर्ज खात्यातून पीक विम्याच्या रकमेची कपात करण्यात आली हाेती.
दरम्यान, शेवटच्या टप्प्यात तुडतुड्यांचा प्रादुर्भावामुळे त्यांच्या सहाही एकरातील धानाचे पीक उद्ध्वस्त झाले. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी त्यांनी महागड्या कीटकनाशकांना वेळावेळी फवारणी केली. मात्र, फारसा उपयाेग झाला नाही. यातून सहा एकरात केवळ ११ पाेती धानाचे उत्पादन झाल्याने बियाणे, लागवड व मशागतीचाही खर्च भरून निघाला नाही, असेही त्यांनी सांगितले. पीक विमा कंपनीकडून लाभ मिळावा म्हणून त्यांनी विमा कंपनीसाेबतच तालुका प्रशासन व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रारी करून दाद मागितली. परंतु, त्यांना अथवा पत्नीला कंपनीने पीकविम्याचा परताना दिला नाही, असेही त्यांनी सांगितले.
....
पिकाची पाहणी देखील केली नाही
इस्तारू गिरेपुंजे यांनी पीक विमा कंपनीकडे पीक नष्ट झाल्याची तक्रार करूनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली नाही. तहसीलदार प्रशांत सांगळे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी व काही लाेकप्रतिनिधींनी त्यांच्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली हाेती. पीक विमा काढतेवेळी बॅंक शाखा व्यवस्थापकाने त्यांना विमा काढल्याची काेणतीही कागदपत्रे मागणी करूनही दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
...
ग्राहक आयडी देण्यास टाळाटाळ
पीक विमा काढल्यानंतर बॅंके प्रशासन त्या शेतकऱ्यास विमा काढल्याची कागदपत्रे किंवा ग्राहक आयडी क्रमांक देतात. इस्तारू गिरिपुंजे यांना बॅंक प्रशासनाने विमा काढल्याचे कागदपत्र दिले नाहीत. तक्रार करावयाची असल्याने तयांनी शाखा व्यवस्थापकाकडे ग्राहक आयडीची वारंवार मागणी केली. ग्राहक आयडी देण्यात टाळाटाळ करण्यात आली, असा आराेपही त्यांनी केला आहे. ग्राहक आयडी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून कंपनी व प्रशासनाकडे तक्रार केली.
...
पीक विमा कंपनीचे काही कर्मचारी तहसील कार्यालयात आले हाेते. त्यांना इस्तारू गिरिपुंजे यांच्या पिकाच्या नुकसानीबाबत माहिती आहे. त्यांना परतावा मिळावा म्हणून आपण त्या कर्मचाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. परताव्याची रक्कम तातडीने गिरिपुंजे यांच्या खात्यात जमा करण्याची सूचनाही आपण त्यांना केली.
- प्रशांत सांगळे,
तहसीलदार, माैदा.