‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:40+5:302020-12-03T04:18:40+5:30
उमरेड : कोळसा उत्पादनात कर्तव्य बजावणाऱ्या वेकोलिच्या सेवानिवृत कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम दोन ते तीन वर्षांपासून रखडली आहे. अनेकदा चर्चा, ...
उमरेड : कोळसा उत्पादनात कर्तव्य बजावणाऱ्या वेकोलिच्या सेवानिवृत कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम दोन ते तीन वर्षांपासून रखडली आहे. अनेकदा चर्चा, अर्ज, निवेदने आणि हेलपाटे मारूनही वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही रक्कम मिळणार कधी, असा सवाल सेवानिवृत्त कामगारांचा आहे.
उमरेड वेकोलि उपक्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांना ही समस्या भेडसावत असून, सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या या ग्रॅच्युईटी रकमेबाबत वेकोलि प्रशासन उदासीन असल्याच्या प्रतिक्रिया कामगारांच्या आहेत. ज्या कामगारांनी ३० वर्षे वा त्यापेक्षा अधिक सेवाकार्य दिले, त्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळत असते. विशेषत: ग्रॅच्युईटीची रक्कम रुजू झाल्यापासून द्यायला हवी. असे असताना वेकोलि प्रशासनाने संबंधित कामगार नोकरीवर कायम झाल्यापासून ही रक्कम काढल्या गेल्याची बाब समोर आली आहे.
साधारणत: २४० दिवसानंतर कामगार कायमस्वरूपी होतात. वेकोलि अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचे विपरीत परिणाम कामगारांना सोसावे लागत असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे. आज उमरेड उपक्षेत्राच्या वेकोलि मुख्यालयासमोर काही कामगारांनी निदर्शने केली. कामगारांची समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करू, असा इशारा जवाहर कमाने, रमेश इलमुलवार, रविशंकर चवळे, दत्तू हिरडकर, नाना नागदेवते, चंदन पाटील, दशरथ रेवतकर, अरविंद कोलते, एस. एम. सावध, भरत धावडा आदींनी दिला आहे. याप्रकरणी उमरेड वेकोलि उपक्षेत्राचे महाप्रबंधक आलोककुमार श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
-----------------------------------------------------------
न्यायालयाची अवमानना?
सेवानिवृत्तीनंतर मिळत असलेल्या ग्रॅच्युईटीच्या रकमेबाबत काही कामगारांनी केंद्रीय कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १० टक्के व्याजासह ही रक्कम देण्याचे आदेश वेकोलिला दिले. शिवाय न्यायालयीन निर्णयानंतर वेकोलि प्रशासनाने कोणतेही अपील केले नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरसुद्धा आमच्यावर अन्याय का, असा सवाल करीत निदान वेकोलिने न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.