लसीचा दुसरा डोस कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:25+5:302021-05-28T04:07:25+5:30
मौदा : तालुक्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र, आता लसीचा दुसरा डोस घेण्याची ...
मौदा : तालुक्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र, आता लसीचा दुसरा डोस घेण्याची कालमर्यादा संपत असतानाही अनेकांचा दुसरा डोस अद्यापही मिळालेला नाही. लस मिळावी म्हणून वयोवृद्धांना रोजच लसीकरण केंद्रावर चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासन आणि सरकारविरुद्ध नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
मौदा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोसही देण्यात आला. आता त्याला ५० ते ५५ दिवसांचा कालावधी झाल्याने दुसऱ्या डोससाठी नागरिक लसीकरण केंद्रावर चकरा मारत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत पाठविले जात आहे. ग्रामीण भागात नागरिकांना ऑनलाइन नोंदणीचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे मौदा तालुक्यात आता १०० टक्के लसीकरणाची आशा मवाळ झाली. ज्यांच्याकडे ऑनलाइनची सुविधा नाही, अशांनी लस घेऊ नये का, असा सवालही केला जात आहे.
--
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनी म्हणजे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देण्याचे शासनाचे आदेश आहेत. अनेकांचा हा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. मात्र, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस एक महिन्यानंतरच घेता येतो.
- डॉ.रुपेश नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी, मौदा