जेसीबीने उद्ध्वस्त विहीर प्रकरणात कारवाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:08+5:302021-02-18T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कुठलीही पूर्वपरवानगी न घेता जेसीबीच्या माध्यमातून विहीर उद्ध्वस्त केल्याप्रकरणात नागरिकांनी उमरेड पालिकेकडे तक्रार केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कुठलीही पूर्वपरवानगी न घेता जेसीबीच्या माध्यमातून विहीर उद्ध्वस्त केल्याप्रकरणात नागरिकांनी उमरेड पालिकेकडे तक्रार केली होती. याबाबत वर्तमानपत्राने दखल घेतल्यानंतर पालिकेने संबंधितास नोटीस बजावली, आता याप्रकरणात कारवाई कधी, असा सवाल नागरिकांचा आहे. जोगीठाणा पेठ परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये ‘सोंगाड्याची विहीर’ या नावाने ओळख असलेल्या सार्वजनिक विहिरीची तोडफोड आणि ती बुजवून शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी रमेश कारगावकर यांना पालिकेने नोटीस बजावली आहे. ३१ जानेवारीला सकाळी जेसीबी मशीन व मजुरांच्या माध्यमातून हा प्रकार करण्यात आल्याची बाब पालिकेच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.
सदर कृत्य नगर परिषद व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २१५ मधील तरतुदीचे उल्लंघन करणारे असून, सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयाचे नुकसान केल्याच्याही बाबीचा उल्लेख पालिकेच्या पत्रात आहे. नोटीस मिळताच सार्वजनिक विहीर पूर्ववत करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. सदर पत्र उमरेड पालिकेने २ फेब्रुवारी २०२१ ला पाठविले आहे. दरम्यान, रमेश कारगावकर यांनी विहीर त्यांच्या मालकीच्या जागेवर असल्याबाबत पत्र दिले आहे. याप्रकरणी अद्याप कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
....
अभ्यास सुरू आहे
या विहीरप्रकरणी पालिकेचे अभियंता जगदीश पटेल यांच्याशी चर्चा केली असता, सिटी सर्व्हे विभागाने सार्वजनिक विहीर असल्याची बाब सांगितली असल्याचे ते बोलले. प्रकरण जरा वेगळे आहे. यामुळे थोडा विलंब होत आहे. परंतु याप्रकरणी कारवाई नक्की होईल, तूर्त अभ्यास सुरू आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.