कधी मिळणार रजा रोखीकरण?; हवालदिल निवृत्त ST कर्मचाऱ्यांचा उद्विग्न सवाल
By नरेश डोंगरे | Published: March 30, 2024 09:25 PM2024-03-30T21:25:57+5:302024-03-30T21:26:09+5:30
‘एसटी’ने रोखली कोट्यवधींची रोकड : रक्कम नाही अन् समाधानकारक उत्तरही नाही
नागपूर : राज्य परिवहन महामंडळाकडे एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची रजा रोखीकरणाची (लिव्ह बॅलेन्स) कोट्यवधींची रोकड अडकून आहे. दोन वर्षे होऊनही रक्कम पदरात पडली नसल्याने ही रक्कम कधी मिळणार, असा उद्विग्न सवाल हवालदिल निवृत्त कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
आधी कोरोना आणि नंतर संपाचा तडाखा बसल्यामुळे आर्थिक घडी पुरती विस्कळीत झालेल्या एसटी महामंडळाला गेल्या दीड वर्षापासून महिलांनी लक्ष्मीच्या रूपात मदतीचा हात दिला आहे. सरकारने एसटीच्या प्रवासात महिलांना सरसकट अर्ध्या तिकिटात प्रवास करू देण्याची योजना सुरू केल्यापासून एसटीला सुगीचे दिवस आले आहेत. उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, उत्पन्न वाढले तरी एसटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभात फारसा फरक पडलेला नाही. उलट त्यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळावा म्हणून महिन्यांपूर्वीपर्यंत झुंजावे लागत होते. अलीकडे ही स्थिती सुधारली असली तरी एसटीतून निवृत्त झालेल्यांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभासाठी महामंडळाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. राज्यातील शेकडो निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरणाचे कोट्यवधी रुपये जुलै २०२२ पासून एसटीने रोखले आहे. ही रक्कम मिळावी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारणारे हवालदिल कर्मचारी ‘कधी मिळणार लिव्ह बॅलन्स,’ असा उद्विग्न सवाल विचारत आहेत.
नागपूर जिल्ह्याचे २.९० कोटी
रजा रोखीकरणाच्या रकमेबाबत एकट्या नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ५०० पेक्षा जास्त कर्मचारी एसटीतून निवृत्त झाले. त्यांच्यापैकी १७५ निवृत्तांचे २ कोटी, ९० लाख रुपये जुलै २०२२ पासून एसटीकडे अडकले आहेत. ही रक्कम का अडकली, यावर बोलण्याचे संबंधित अधिकारी टाळतात. उत्तराखातर एसटीचे वरिष्ठ अधिकारी मुख्यालयातील (मुंबई) अधिकाऱ्यांकडे बोट दाखवितात. नागपूरच नव्हे तर राज्यात सर्वत्र हीच स्थिती आहे, आमच्या अधिकाराच्या पलीकडची ही बाब असल्याचे अधिकारी म्हणतात.
... तर, लवकर आंदोलन करू
नोकरीत असताना कमी पगार अन् निवृत्तीनंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते. त्यामुळे आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी निवृत्तांना पै अन् पै मोलाची ठरते. अशात दोन वर्षांपासून निवृत्तांची रक्कम अडवून ठेवण्यामागचे कारण काय, या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. ही रक्कम तातडीने दिली गेली नाही तर आम्ही आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी दिली आहे.