महिलांची कुचंबणा कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:18 AM2017-10-17T00:18:02+5:302017-10-17T00:18:24+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु वर्दळीच्या वा बाजार भागात शौचालयाची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता भाजपाचे नगरसेवक निशांत गांधी यांनी सोमवारी सभागृहात शौचालय सुविधाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु बसपाच्या नगरसेवकांनी धुमाकूळ घातल्याने या महत्त्वाच्या विषयावरील चर्चा बारगळल्याने महिलांची होणारी कुचंबणा कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१५ मध्ये शहरातील वर्दळीच्या व मोक्याच्या ५० ठिकाणी महिला शौचालये उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन उपायुक्त संजय काकडे यांनी ६ एप्रिल २०१५ रोजी न्यायालयात याबाबत शपथपत्र दिले होते. यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य शौचालये उभारण्यास तयार आहे. शौचालयाची देखभाल, पाणी , वीज व जागा महापालिकेने उपलब्ध करावयाची आहे. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या अडीच वर्षात जेमतेम १२ अस्थायी शौचालये उभारण्यात आलेली आहेत. उर्वरित शौचालये कधी उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. निशांत गांधी यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली असती, तर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असता.
शौचालयाची सुविधा नसल्याने वेळप्रसंगी लघवी वा शौच रोखून धरावी लागते. याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. संसर्गजन्य व मूत्राशयाचे आजार होण्याचा धोका असतो. वास्तविक न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार वा वर्दळीच्या भागात प्रत्येकी ५०० मीटर अंतरावर महिला शौचालयांची सुविधा असायला हवी. शौचालयाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, दर फलक, सेवा मोफत की शुल्क आकारले जाते, याची माहिती असलेले फलक, दिव्यांगांसाठी रॅम्प अशा सुविधांची गरज आहे. शहरात उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या ठिकाणी या सुविधा नाही. शौचालयातील सुविधा व समस्या मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. परंतु या समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही.
हॉटेलमधील शौचालय वापरण्याला संमती
नागपूर शहराच्या विविध भागात तसेच वर्दळीच्या बाजार भागात हॉटेल्स आहेत. सार्वजनिक शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. हे विचारात घेता हॉटेल्समधील शौचालयांचा महिलांना वापर करता यावा, यासाठी अनुमती मिळण्यासंदर्भात नगसेवक निशांत गांधी यांनी नागपूर रेसिडेंटल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी याला सहमती दर्शविली आहे. महिला व युवतींना वेळप्रसंगी गरज भासल्यास हॉटेलमधील शौचालयाचा वापर करता येईल, अशी माहिती निशांत गांधी यांनी दिली. यामुळे शहरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.