मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होतील? प्रेमानंद गज्वी यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:36 PM2019-07-27T23:36:14+5:302019-07-27T23:37:18+5:30
एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची धमक नसल्याची भावना व्यक्त करीत ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार... असा परखड सवाल उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची धमक नसल्याची भावना व्यक्त करीत ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार... असा परखड सवाल उपस्थित केला.
नाट्य परिषदेच्या वतीने नंदनवन येथील महिला महाविद्यालयात आयोजित द्विदिवसीय नाट्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे सदस्य शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना भागडीकर, नाट्य लेखक महेंद्र सुके, पराग घोंगे, डॉ. निलकांत कुलसंगे, नरेंद्र शिंदे उपस्थित होते.
लेखकांच्या डोक्यातील आग कधीच कमी होत नाही. मात्र, लेखकांमध्ये रसिकांच्या डोक्याला त्रास देण्याचे कसब असायला हवे. वेदना, जाणीव, नकार, विद्रोह आणि करुणेतून ही क्षमता निर्माण होते. करुणेचा अभाव असेल तर नाटक कधीच पूर्ण होत नसल्याचे गज्वी यावेळी म्हणाले. आपलं नाटक कुटुंबात अडकलं आहे. व्यक्ती, समाज इथपर्यंत एखाद दुसरे लेखक पोहोचले आहेत. मात्र, आता राष्ट्र विरुद्ध राष्ट्र अशी नाट्य लेखकांची व्याप्ती होणे गरजेचे असल्याचे प्रेमानंद गज्वी म्हणाले. संचालन नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे उपाध्यक्ष उपक्रम नरेश गडेकर यांनी केले तर आभार प्रकाश एदलाबादकर यांनी मानले.
मोदींनी ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही!
काश्मीर प्रश्नावर ट्रम्पने मोदींनी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. खरे काय ते दोघांनाच ठाऊक़ मात्र, सांगितलंही असेल. कारण, ते राजकारण आहे आणि कुठे काय बोलावे आणि काय नाही, हे ट्रम्प आणि मोदी या दोघांनाही माहीत आहे. मोदींनी दोघांमध्ये काय बातचीत केली, हे सांगण्याची किंवा ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. राजकारणात पूर्णसत्य कधीच सांगू नये, असे स्वत: डॉ. आंबेडकरांनी सांगितले असल्याचे प्रेमानंद गज्वी यावेळी म्हणाले.