नागपूर जिल्ह्यातील कोट्यवधीचे सौर संयंत्र कधी होणार प्रकाशमय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 09:03 PM2019-12-07T21:03:45+5:302019-12-07T21:06:11+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वसतिगृहात सौर संयंत्र लावून त्या प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वसतिगृहात सौर संयंत्र लावून त्या प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी कोट्यवधी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव मेडा (सौरऊर्जा अभिकरण) या शासनाच्या एजन्सीकडे पाठविण्यात आले़ तसा निधीही डीसीपी व खनिकर्म विकास प्रतिष्ठानने दिला़ या सर्व प्रक्रियेला वर्ष लोटत असताना कुठलेही काम मेडाने पूर्ण केले नाही़
शिक्षण विभागांतर्गत ४ कोटी ३० लाखांचे सौर संयंत्र प्राथमिक शाळांत लागणार होते़ ३०० च्या वर शाळा प्रकाशमान होणार होत्या. ज्या शाळांची देयके प्रलंबित आहेत, तिथे सौर संयंत्र लावण्याचे पूर्वी ठरविण्यात आले होते़ परंतु, मेडाच्या आग्रही मागणीमुळे ज्या शाळेवर वीज बिलाची थकबाकी नाही, अशांचा प्रस्ताव करून तो नव्याने सादर करावा लागला होता़ याच पद्धतीने महिला बालकल्याण विभागाने १५५ अंगणवाड्या सोलरवर करण्याचा निर्णय घेतला, वर्षभरापासून प्रक्रिया सुरू आहे. यासाठीचा निधीही मेडाला हस्तांतरित केला आहे. आरोग्य विभाग आणि समाजकल्याण विभागानेसुद्धा डीपीसी आणि खनिकर्म विकास प्रतिष्ठानने निधी उप्लब्ध करून दिल्यानंतर तत्काळ प्रस्ताव मेडाला पाठविला होता़ हा प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा परिषदेला अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली़ तशा सूचनाही कनिष्ठ यंत्रणांना आल्या़ हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ मात्र, हातात काहीही पदरात आले नाही़ त्यामुळे ही योजनाच फसली असल्याचे आता या कामाच्या मंदगतीवरून पुढे येत आहे़
कंत्राटदारांचीच ‘लॉबिंग’
जिल्हा परिषदेची कोट्यवधींची कामे मेडा या शासनाच्या एजन्सीकडे देण्यात आली़ या ठिकाणी सहा कंत्राटदार पॅनलवर असल्याची माहिती आहे़ ही सहाच मंडळी ‘ऑल इज वेल’ करून दुसऱ्या कुणालाही कामांचे कंत्राट मिळू देत नाही़ बाहेरच्या कंत्राटदाराने सहभागी होण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येतो, अशीही चर्चा आहे़