‘पेट’चे आयोजन होणार तरी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:09+5:302021-02-16T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएच.डी.’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’च्या ( पीएच. डी. एन्ट्रन्स ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएच.डी.’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’च्या ( पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट) नियमावलीत यंदा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्साह असला, तरी अद्यापपर्यंत विद्यापीठाकडून ‘पेट’बाबत काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. ‘पेट’चे आयोजन होणार तरी कधी? असा प्रश्न नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठात पीचए. डी. ची बजबजपुरी माजल्यामुळे विद्यापीठाने सुरुवातीला ‘पेट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केले. डॉ. प्रमोद येवले यांच्या प्र-कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विषयनिहाय ‘पेट-२’ सुरू करण्यात आली. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली. शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर. जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने पीएच. डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच.डी.संदर्भात अधिसूचना काढली आहे.
मात्र अधिसूचना जारी होऊनही दोन आठवडे लोटले आहे. असे असतानाही ‘पेट’च्या आयोजनासंदर्भात काहीच माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे सातत्याने ‘पीएच. डी. सेल’कडे यासंदर्भात विचारणा होत आहे.
प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यावर भर
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाकडून बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. मागील वर्षापर्यंत विषयनिहाय प्रश्नांची उत्तरे विश्लेषणात्मक पद्धतीने द्यावी लागायची. यंदापासून बहुपर्यायी प्रश्न राहणार आहे. त्यामुळे प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यात येत आहे.