गरिबांना कधी मिळणार ‘फोल्डेबल लेन्स’; ‘रिजीड लेन्स’मुळे लागतात एक किंवा दोन टाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 10:34 AM2021-02-24T10:34:17+5:302021-02-24T10:34:41+5:30
२० वर्षांचा कालावधी होऊनही शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध झाले नाही. दुमडत नसलेले ‘रिजीड लेन्स’ दिले जात असल्याने एक किंवा दोन टाके लागतात.
सुमेध वाघमारे
नागपूर : मोतीबिंदूच्या अद्ययावत शस्त्रक्रियेसाठी २००१ मध्ये सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोट्यावधी रुपये खर्चून ‘फॅको’ उपकरण दिले. या उपकरणाद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु २० वर्षांचा कालावधी होऊनही शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध झाले नाही. दुमडत नसलेले ‘रिजीड लेन्स’ दिले जात असल्याने एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णालयात जास्त दिवस घालविण्यापासून ते चष्म्याचा वाढलेला नंबर मिळतो. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच ‘फोल्डेबल लेन्स’ घेऊ शकत असल्याने मोतीबिंदू रुग्णांसोबत हा भेदभाव कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक भिंग अपारदर्शक झाल्यास त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत तो मोत्यासारखा दिसतो. म्हणून त्याला मोतीबिंदू म्हणतात. पूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत डोळ्यात इंजेक्शन देऊन तो बधिर करून सुमारे १०-१२ मिमी इतका लांब छेद कॉर्नियाच्या परिघावर करीत होते. आतले भिंग बाहेर काढून डोळ्याची जखम टाके लावून बंद करीत होते. या शस्त्रक्रियेनंतर, मस्तक जराही हलवू न देता हॉस्पिटलमध्ये सात दिवस सक्तीची विश्रांती आणि महिनाभर डोक्याला ड्रेसिंग असा कार्यक्रम असायचा. २००१ पासून फॅको उपकरण उपलब्ध झाल्याने ‘फॅकोमात्सिफिकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होऊ लागल्या. यात कॉर्नियाच्या परिघावर केवळ २ ते ३ मि.मी. इतका लहान छेद घेऊन ‘फोल्डेबल लेन्स’ बसविणे सुरू झाले. छेद लहान असल्याने तो आपोआप बरा होतो, म्हणून याला बिनटाक्याची शस्त्रक्रियाही म्हटले जाते. परंतु आज १७ वर्षांचा कालावधी होत असतानाही आरोग्य विभागाकडून किंवा ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’कडून दुमडत नसलेला जुनाट ‘रिजीड लेन्स’ उपलब्ध करुन दिला जात असल्याने गरीब रुग्णांना गैरसोयीचे होत आहे. सध्या कॉर्नियाच्या परिघावर ६ ते ७ मि.मी आकाराचा छेद करावा लागत असून एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णांना जिथे काही तास रुग्णालयांत घालवायचे असतात तिथे दोन दिवस घालवावे लागतात. चष्म्याचा नंबरही वाढत असल्याने त्यांच्या दैनंदिन कष्टाच्या कामकाजात समस्या निर्माण होतात.
-रिजीड लेन्सचे तोटे
:: रिजीड लेन्स हार्ड असतो, तो दुमडत नाही
:: यामुळे कॉर्नियाच्या परिघावर ७ ते ८ मि.मी. इतका छेद करावा लागतो.
:: एक किंवा दोन टाके लागतात.
:: टाका लागल्याने रुग्णालयातील दिवस वाढतात
:: चष्म्याचा नंबर वाढतो