गरीब विद्यार्थ्यांना सायकल कधी मिळणार?
By admin | Published: May 16, 2017 02:19 AM2017-05-16T02:19:18+5:302017-05-16T02:19:18+5:30
शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या सायकलींचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकले नाही.
सत्र संपल्यानंतरही विद्यार्थी प्रतीक्षेत : समाजकल्याणच्या ८० लाखांच्या सायकलींचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या सायकलींचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकले नाही. समाजकल्याणच्या सायकल वाटपात घोळ, अनियमितता झाल्याचा मुद्दा मुंबई अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर सीईओंनी यावर अधिकाऱ्यांची चौकशी समिती बसविली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतरही सायकलींचे वाटप झालेले नाही.
जि. प. च्या समाजकल्याण, शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना सायकली पुरविल्या जातात. समाजकल्याण विभागातर्फे २०१६-१७ या वर्षासाठी ८० लाख रुपयांमधून विद्यार्थ्यांना सायकली मंजूर करण्यात आल्या. २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १४८० विद्यार्थ्यांना सायकली द्यायच्या होत्या. समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम यांच्या पुढाकाराने निविदा प्रक्रिया पार पडून सायकलींची खरेदीसुद्धा झाली. सावनेर, पारशिवनी, मौदा, कामठी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यांमध्ये ८३० सायकली पोहोचल्या. मात्र, मध्येच कुठेतरी ‘माशी शिंकली’ आणि सायकलीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. नंतर मात्र विरोधकांनी चूक झाल्याचे मान्य केले खरे. पण, हा मुद्दा मुंबई अधिवेशनात आमदारांकडून उपस्थित केल्यामुळे सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सायकल वाटप थांबविण्याचे आदेश देऊन अधिकाऱ्यांची समिती चौकशीसाठी नेमली. या घडामोडीत विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नाही. समितीची चौकशी कासवगतीने सुरू असल्याची नाराजी सभापती गेडाम यांनी व्यक्त केली. नुकतीच चौकशी करून समितीने अहवाल डॉ. बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.
नवे सत्र सुरू होण्यापूर्वी मिळेल
सायकलप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल सीईओंकडे देण्यात आला आहे. ८० लाखांच्या सायकल खरेदीपैकी ८५० सायकली पाच पंचायत समितीत पोहचल्या आहे. सीईओंकडून उर्वरित ६३० सायकलींना मंजुरी दिली आहे. लवकरच सायकलींचा पुरवठा होईल. काही सदस्यांकडून अद्यापही लाभार्थ्यांच्या याद्या यायच्या आहेत. नवे सत्र सुरू होण्यापूर्वी सायकलींचे वाटप होईल, असा विश्वास समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम यांनी व्यकत केला.
डीबीटीमध्ये रखडल्या बालकल्याण व शिक्षणच्या सायकली
सायकल खरेदी प्रक्रियेत समाजकल्याणने बाजी मारली, तर दुसरीकडे शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीच्या सायकली ‘डीबीटी’ (डायरेल्ट बॅक ट्रान्सफर) च्या कचाट्यात रखडल्या आहेत. यात महिला व बाल कल्याणच्या ८० लाख व शिक्षण विभागाच्या ५० लाख रुपयांच्या सायकलींचा समावेश आहे.