मनोरुग्णालयातील डॉक्टर कधी होणार शहाणे ?
By admin | Published: January 19, 2017 02:32 AM2017-01-19T02:32:05+5:302017-01-19T02:32:05+5:30
नागपूर प्रादेशिक शासकीय मनोरुग्णालयात डॉक्टरांची मनमानी सुरू आहे. त्यांची रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ८ ची आहे.
यायची वेळ ८ ची, डॉक्टर येतात ९.३० ला : उपचारासाठी ताटकळत उभे असतात रुग्ण
योगेंद्र शंभरकर नागपूर
नागपूर प्रादेशिक शासकीय मनोरुग्णालयात डॉक्टरांची मनमानी सुरू आहे. त्यांची रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ८ ची आहे. परंतु डॉक्टर पोहोचतात सकाळी ९.३० ला. याचा फटका रुग्णांना बसत असून शहर व आजूआजूच्या गावातून उपचारासाठी येथे येणाऱ्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली. लोकमतची टीम मंगळवारी सकाळी ८ वाजता मनोरुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत दाखल झाली. येथे कसे काम चालते यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी ही टीम सकाळी ८ पासून रुग्णांसोबत बसून राहिली. ओपीडी कार्ड काऊंटरवर सकाळी ८ ते दुपारी १ अशी वेळ लिहिली होती. काही अटेंडेंट, गार्ड आणि नर्स वेळेत रुग्णालयात दाखल झाले. पण, तरीही हे काऊंटर २० मिनिटानंतर सुरू झाले.
रूम नंबर दोन जेथे ओपीडी असते तेथे ८.४५ पर्यंत डॉक्टरांचा पत्ता नव्हता. टीम औषध वितरण विभागात पोहोचली.
फार्मासिस्ट असतानाही अटेंडंट वाटतो औषध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरुग्णालयाच्या औषध विभागात दोन फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. याचे कारण, मनोरुग्णांना १० ते १२ प्रकारची औषधे दिली जातात. अनेकदा तर अटेंडंटच रुग्णांना औषध देत असतो. या विभागात आधीच दोन फार्मासिस्ट आहेत, अटेंडंटही प्रशिक्षित आहे तर मग आणखी फार्मासिस्टची गरज का पडतेय, हा खरा सवाल आहे.
इतका उशीर होतोच कसा?
काही रुग्णांच्या नातेवाईकांनी नाव न छापण्याच्या अटीवर डॉक्टरांची तक्रार केली. ते म्हणाले, वाहतुकीच्या गर्दीमुळे १०-१५ मिनिटांचा उशीर समजू शकतो. परंतु गलेलठ्ठ पगार घेऊनही येथील डॉक्टर तासतासभर उशिरा येत असतील तर योग्य नाही. याचा अर्थ येथील डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही. येथील पुरुष डॉक्टरांचा रेकॉर्ड थोडा बरा आहे. ते किमान सकाळी ९पर्यंत तरी पोहोचतात. परंतु महिला डॉक्टर नेहमी ९.३० नंतरच रुग्णालयात येतात.
बायोमेट्रिक मशीन नाही?
अधिक माहिती जाणून घेतली असता कळले की रुग्णालय उपअधीक्षकांच्या खोलीत ठेवलेल्या एका रजिस्टरवर उपस्थित कर्मचारी सही करतात. परंतु उशिरा आल्याची नोंद एखादाच डॉक्टर करतो. मंगळवारी सकाळी ९ वाजता एक पुरुष डॉक्टर आले. सही करून ९.३० पर्यंत ओपीडीमध्ये बसले. यानंतर आलेले डॉक्टर सकाळी ९.३० वाजता रजिस्टरवर सही करताना आढळून आले.