उपराजधानीत ‘क्वारंटाईन’मधील तपासणीचा वेग कधी वाढणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:08 AM2020-05-14T10:08:52+5:302020-05-14T10:10:12+5:30
नागपुरात क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. सोबतच या सेंटरमधील असुविधांमुळेही संसर्ग पसरत असल्याची भीतीही लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत नागपुरात क्वारंटाईन केलेल्या जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात गेल्या १८ दिवसात २०० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यादरम्यान हजारो लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. सोबतच या सेंटरमधील असुविधांमुळेही संसर्ग पसरत असल्याची भीतीही लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत नागपुरात क्वारंटाईन केलेल्या जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
मेयो व मेडिकलमधील प्रयोगशाळेवर नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील नमुने तपासण्याचा भार वाढू लागला आहे. यासोबत छत्तीसगड व मध्यप्रदेशातील नमुनेही तपासणीसाठी येथे पाठवले जात आहेत. अशा परिस्थितीत नागपुरातील नमुने कमी प्रमाणावर तपासले जात आहेत. आता या दोन्ही प्रयोगशाळांच्या मदतीसाठी माफसु, नागपूर एम्स आणि नीरीच्या प्रयोगशाळेतही तपासणी सुरू झाली आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढल्यानंतर दैनिक नमुन्यांची संख्या ५०० वर पोहोचली आहे. अगोदर ती दररोज २०० पेक्षा कमी होती. परंतु यानंतरही विदर्भातील नमुन्यांची संख्या यापेक्षा जास्त असल्याने ती तपासली जात नाही.
तपासणीत केव्हा येणार गती?
आतापर्यंत नागपुरात ६,२८५ नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३०० पेक्षा अधिक लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २,२५३ लोक अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. ४६६ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांची ज्या गतीने तपासणी व्हायला हवी, ती होत नाही. अशा परिस्थितीत लोकही दहशतीत आहेत. कारण या सेंटरमधील सध्याच्या व्यवस्थेमुळे त्यांना संसर्ग होण्याची जास्त भीती वाटत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील अव्यवस्था, शौचालयासह विविध साहित्यांचा सार्वजनिक वापर, वॉटर कुलरमधून सर्वांनाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबलवर ठेवलेला चहा सर्वांनाच शेअर करणे आदींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका वाढल्याचा आरोपही होत आहे.