रेल्वेस्थानक कधी होणार स्वच्छ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:48 AM2017-09-07T01:48:19+5:302017-09-07T01:48:45+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा आढळल्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वे अधिकाºयांना चांगलेच खडसावले. स्वच्छता राखण्यासाठी त्वरित योग्य ती पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा आढळल्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वे अधिकाºयांना चांगलेच खडसावले. स्वच्छता राखण्यासाठी त्वरित योग्य ती पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. नागपूर-इटारसी सेक्शनचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा केला.
पाहणी दौºयात महाव्यवस्थापक शर्मा यांनी घाट सेक्शनची रेल्वे लाईन, ओएचई, फूट प्लेटचे विंडो ट्रेलिंग निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता, ‘एडीआरएम’त्रिलोक कोठारी आणि विभागातील अधिकारी उपस्थित होते. निरीक्षण दौरा आटोपल्यानंतर महाव्यवस्थापकांनी नागपूर रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांनी जनरल वेटिंग हॉल, कमसम हॉटेल, जनाहार, शौचालय, फूड स्टॉलला भेट देऊन तेथील स्वच्छतेचा आढावा घेतला. येथून ते रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पोहोचले. तेथे सीसीटीव्ही कक्षाबाहेरील अस्वच्छता पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. त्यावर आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांनी कारण सांगितले. त्यानंतर त्यांची नजर बाजूला पडून असलेल्या बॅटरीवर गेली. ही बॅटरी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला असता इंजिनीअरिंग विभागाचे अधिकारी धास्तावले. त्यांचे उत्तर ऐकल्यानंतर महाव्यवस्थापकांनी ही बॅटरी व्यवस्थित ठेवण्याची सूचना केली. आरपीएफ ठाण्यातून निघाल्यानंतर एसी वेटिंग हॉलच्या बाहेरील चाईल्ड लाईनच्या बुथवर ते पोहोचले. तेथील महिला कर्मचाºयांना त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून सहकार्य मिळत आहे की नाही, याची खात्री करून घेतली. चाईल्ड लाईनच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांची नजर बाजूलाच असलेल्या घाणीकडे गेली. त्यांनी त्वरित या घाणीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागपूर कोचिंग डेपोचेही बारकाईने निरीक्षण केले. येथील विविध कामांची पाहणी करून त्यांनी सूचना दिल्या. यावेळी महाव्यवस्थापक शर्मा, डीआरएम गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रात्रीच्या विमानाने ते दिल्लीला रवाना झाले.
सुरक्षेसाठी ‘शॉर्टकट’ वापरू नका
निरीक्षणानंतर महाव्यवस्थापक शर्मा यांनी ‘डीआरएम’कार्यालयाच्या सभागृहात अधिकाºयांची बैठक घेतली. त्यांनी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे सांगून रेल्वे रुळाची डागडुजी, सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरविण्याचे आवाहन केले. कामात कुठलाही शॉर्टकट न वापरता कामाच्या जागी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी अपघातरहित रेल्वेच्या संचालनासाठी रेल्वेगाडीचे कोच, वॅगनची स्थिती चांगली ठेवण्यावर भर दिला. ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न करण्याचे आणि पेपरलेस कामाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.