कधी होणार आरसी बुक ‘स्मार्ट’
By admin | Published: February 27, 2017 02:04 AM2017-02-27T02:04:18+5:302017-02-27T02:04:18+5:30
राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे.
आरटीओ : दोन वर्षांनंतरही नोंदणी पुस्तक कागदावरच
नागपूर : राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी ‘सारथी ४’ या आॅनलाईन आणि ‘स्मार्ट’ पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. वाहनधारकांना हा कागद जपून ठेवणे जिकिरीचे जात आहे.
परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.
परंतु यादरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्री प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसीची समस्या कायम आहे. यातच दिवसाकाठी सुमारे ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत आहे. पूर्वी स्मार्ट कार्डच्या स्वरूपात हेच आरसी बुक शंभरावर तयार व्हायचे. वेळेत आरसी मिळत नसल्याच्या
वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यातच हा कागद जपून ठेवणे जिकिरीचे जात आहे. ‘लॅमिनेशन’ केल्यावरही कागद फाटत असल्याचे अनेक वाहनधारकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)