कधी होणार ‘सेफ सर्जरी’?
By admin | Published: March 1, 2017 02:15 AM2017-03-01T02:15:35+5:302017-03-01T02:15:35+5:30
हाडाच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला भूल देण्याचे इंजेक्शन देताच रुग्णाचे हृदय बंद पडले.
मेडिकल : शस्त्रक्रिया सुरू होत नाही तोच रुग्णाचा मृत्यू
नागपूर : हाडाच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला भूल देण्याचे इंजेक्शन देताच रुग्णाचे हृदय बंद पडले. यातच ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ५०० प्रकरणांमध्ये अशा एक-दोन घटना घडतात असे म्हणून डॉक्टरांनी हात वर केले, मात्र सुरक्षित शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना अशा घटना घडतातच कशा, व मेडिकलमध्ये कधी होणार सुरक्षित शल्यक्रिया (सेफ सर्जरी) असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तुळसाबाई जुमळे (६६) रा. बेलतरोडी असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळसाबाई जुमळे यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरील हाड तुटले होते. यावरील उपचारासाठी त्या ११ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या अस्थिरोग विभागाच्या युनिट तीन अंतर्गत येणाऱ्या वॉर्डात भरती झाल्या. २७ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या ‘शस्त्रक्रिया गृह-डी’मध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांना नेण्यात आले. येथे बधिरीकरण तज्ज्ञाने भूलीचे इंजेक्शन देताच तुळसाबाई यांचे अचानक हृदय बंद पडले (कार्डिआॅक अरेस्ट). डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावर हृदय पुन्हा सुरू झाले, परंतु थोड्याच वेळात पुन्हा ‘कार्डिआॅक अरेस्ट’ येऊन त्यांचा मृत्यू झाला. भूल देण्याचे इंजेक्शन एका शिकाऊ डॉक्टरने दिले आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचे
नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात त्यांनी लेखी तक्रार केली नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती देताना बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे म्हणाले, शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णाचे वय फार जास्त होते, त्यांना रक्तदाबाचा आजार होता परंतु शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे होते. यातील धोके रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आणून देण्यात आले होते. त्यांच्या संमतीनंतरच शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. परंतु त्या पूर्वीच त्यांचे हृदय बंद पडले. अशा रुग्णांमध्ये धोक्याची शक्यता अधिक असते, असेही ते म्हणाले.
ना चेक लिस्ट, ना अद्ययावत यंत्रणा
अनेक खासगी व मोठ्या रुग्णालयात ‘सेफ सर्जरी’कडे गंभीरतेने पाहिले जात असताना शासकीय रुग्णालयांमध्ये ती सोय का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एका वरिष्ठ शल्यचिकित्सकाच्या मते काही चांगल्या खासगी इस्पितळांमध्ये शस्त्रक्रियांना गंभीरतेने घेतले जाते. रुग्णाच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देणारे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार (डब्ल्यूएचओ) ‘चेक लिस्ट’ तयार केली जाते. शल्यचिकित्सकापासून ते बधिरीकरणतज्ज्ञ व परिचारिकांच्या चमूला विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते, आणि नंतरच शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये कुठलीही ‘चेक लिस्ट’ राहत नाही. अद्ययावत तंत्रज्ञान नाही. यातच रुग्णांची संख्या मोठी असल्याने बारीकसारीक गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात नसल्याने असे धोके होतात, असेही ते म्हणाले.